...तर राहुलला बाहेर काढा, गावसकर भडकले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा भारताची बॅटिंग गडबडली.

Updated: Dec 7, 2018, 04:58 PM IST
...तर राहुलला बाहेर काढा, गावसकर भडकले title=

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा भारताची बॅटिंग गडबडली. चेतेश्वर पुजाराची शतकी खेळी वगळता एकाही भारतीय बॅट्समनना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पुजाराच्या १२३ रनच्या खेळीमुळे भारताला २५० रनपर्यंत मजल मारता आली. भारताचा ओपनर केएल राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. पहिल्या इनिंगमध्ये राहुल ८ बॉलमध्ये २ रन करून आऊट झाला. राहुलच्या या कामगिरीनंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर चांगलेच भडकले आहेत. दुसऱ्या इनिंगमध्येही राहुल असाच आऊट झाला तर त्याला टीममधून बाहेर काढा, असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे.

केएल राहुल याच्याकडे आता आत्मविश्वास राहिलेला नाही. एकवेळ अशी होती जेव्हा तो एका विश्वासानं मैदानात यायचा. पण आता तो बाहेर जाणाऱ्या बॉलवर शॉट मारण्याचा गोंधळ करतो, असं गावसकर म्हणाले. आपल्या तंत्रामध्ये असलेली चूक सुधारण्याची परवाही राहुल करत नसल्याची बोचरी टीका गावसकर यांनी केली.

जेव्हा तुम्ही लेग स्टम्पचा गार्ड घेऊन हलता तेव्हा तुम्हाला स्टम्प कुठे आहेत ते माहिती असतं. पण त्याच्या सारखा उंची असलेला एक बॅट्समन बॅकफूटवर ऑफ स्टम्पवर गार्ड घेऊन हलतो. यामुळे तुम्ही ऑफ स्टम्पबाहेरचा बॉल खेळायचा प्रयत्न करता आणि म्हणून स्लिपमध्ये आऊट होता. इंग्लंडमध्येही राहुलनं तिच चूक केली आणि आता ऑस्ट्रेलियामध्येही तो तीच चूक करतोय. हे त्यालाही माहिती आहे, असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.

७१ दिवसात एकही अर्धशतक नाही

२६ वर्षांच्या केएल राहुलनं शेवटचं अर्धशतक यावर्षी आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध लगावलं होतं. २५ डिसेंबरला राहुलनं ६० रनची खेळी केली होती. ओपनर केएल राहुलचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये संघर्ष सुरुच आहे. या दौऱ्यातली राहुलची ही चौथी मॅच आहे. याआधी झालेल्या टी-२० सीरिजमध्ये राहुलला एकूण २७ रनच करता आल्या होत्या. टी-२० सीरिजमध्ये राहुलला २ मॅचमध्येच खेळायची संधी मिळाली होती. सीरिजची दुसरी मॅच पावसामुळे रद्द झाली होती.

वेस्ट इंडिजविरुद्धही राहुल फेल

ऑस्ट्रेलियाच नाही तर वेस्ट इंडिजविरुद्धही राहुलला अपयश आलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ टी-२० मॅच आणि २ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये राहुल भारतीय टीमचा हिस्सा होता. ३ टी-२० मॅचमध्ये राहुलनं ५९ रन केले होते. राहुलनं पहिल्या मॅचमध्ये १६, दुसऱ्या मॅचमध्ये नाबाद २६ आणि तिसऱ्या टी-२०मध्ये १७ रन केले होते. २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये राहुलला ३ वेळा बॅटिंगची संधी मिळाली. यातल्या एकवेळा राहुल शून्यवर आऊट झाला, तर त्यानं एकदा ४ रन आणि एकदा ३३ रन केले.

१४ टेस्ट इनिंगमध्ये फक्त १ शतक

मागच्या १४ टेस्ट इनिंगमध्ये राहुलला फक्त एकदाच अर्धशतकापेक्षा मोठा स्कोअर करता आला. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये राहुलनं १४९ रनची खेळी केली होती. या खेळीमुळेच राहुलचं भारतीय टीममधलं स्थान पक्कं झालं. पण या मॅचनंतर राहुलनं ४ टेस्ट इनिंग खेळल्या. यामध्ये त्याचा स्कोअर ०, ४, ३३ नाबाद आणि २ रन असा आहे.

१८ वर्षातला ३२ टेस्ट खेळणारा पाचवा ओपनर

केएल राहुलला प्रतिभावान खेळाडू समजलं जातं. राहुल मागच्या १८ वर्षातला ५वा ओपनर आहे ज्यानं ३२ पेक्षा जास्त मॅच खेळल्या आहेत. त्याच्याशिवाय सेहवाग (१०३), मुरली विजय(६०), गौतम गंभीर (५८) आणि शिखर धवन(३४) या खेळाडूंनी एवढ्या मॅच खेळल्या आहेत.

२०१८ मध्ये राहुलच्या ४२२ रन

२०१८ या वर्षात केएल राहुलनं ११ टेस्ट मॅच खेळल्या. या मॅचच्या १९ इनिंगमध्ये राहुलनं २३.४४ च्या सरासरीनं ४२२ रन केले आहेत. यावर्षात राहुलला फक्त १ शतक आणि १ अर्धशतक बनवता आलं. राहुलचा हा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला भारताचा तिसरा ओपनर पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये शॉचं खेळणं मुश्कील आहे.