CSK vs LSG: मंगळवारी चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात 6 विकेट्सने लखनऊने चेन्नईवर दमदार विजय मिळवला. मात्र या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार केएल राहुलचा रौद्र अवतार चाहत्यांना पाहयला मिळाला. या सामन्यात केएल राहुल अंपायरशी भांडताना दिसला. काही दिवसांपूर्वी RCB vs KKR मॅचमध्ये विराट कोहलीचा राग शिगेला पोहोचला होता. यानंतर असंच काहीसं चित्र पुन्हा एकदा दिसलं.
मार्कस स्टॉइनिसच्या बॉलवर लखनऊचा कर्णधार राहुलने जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट न दिल्याबाबत डीआरएस घेतला होता. मैदानावरील अंपायर्सने रवींद्र जडेजाला नाबाद घोषित केले होते. परंतु डीआरएसनंतर टीव्ही अंपायर्सने देखील जडेजाला नाबाद घोषित केले. अशा स्थितीत चेंडू विकेटला लागूनही केएल राहुल अंपायरशी भिडला. याचा व्हिडीओ आणि फोटोस सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत.
सीएसके फलंदाजी करत असताना 8 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली आहे. स्टॉइनिसच्या ओव्हरमधील 5 वा बॉल जडेजाच्या पॅडला लागला. यावेळी स्टॉइनिसने जोरदार अपील केलं आणि त्यानंतर केएल राहुलनेही रिव्ह्यू घेण्यास होकार दिला. कमेंट्रेटर्सच्या मते, बॉल जास्त बाऊंस घेऊ शकला असता, त्यामुळे राहुलने डीआरएस घेण्याबाबतही शंका व्यक्त केली होती. जेव्हा डीआरएस घेण्यात आला तेव्हा बॉल ट्रॅकिंग सिस्टममध्ये असं दिसून आलं की, बॉल लेग स्टंपच्या वर गेला होता. बॉल इतका कसा उसळू शकतो हे राहुलला समजले नाही. यामुळे त्याने मैदानावरील अंपायरशी वाद घालण्यास सुरुवात केली.
याच सामन्यात राहुलने अजिंक्य रहाणेचा उत्कृष्ट कॅच घेतला. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सीएसकेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बॉल रहाणेच्या बॅटला लागला आणि कीपरच्या दिशेने गेला. राहुलने अतिशय चपळाईने उडी मारत हा कॅच घेतला. रहाणे 3 बॉलमध्ये केवळ 1 रन काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 211 रन्सचा पाठलाग करताना ओपनर डी कॉक पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. यानंतर केएल राहुल आणि मार्क स्टोइनिस यांनी डाव सावरला. राहुलच्या विकेटनंतर स्टोइनिस आणि देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतकी भागीदारी साकारली. ही जोडी जमलेली असतानाच पडिक्कलला बाद झाला. दुसरीकडे स्टोइनिसने मात्र अफलातून खेळी साकारताना नाबाद शतकी खेळी साकारली. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर टीमने विजय मिळवला.