मुंबई : आयपीएल २०१८ मध्ये हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनची बॅट जबरदस्त गरजली आहे. आयपीएलच्या लिलावानंतर हैदराबादनं डेव्हिड वॉर्नरला कर्णधार बनवलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं डेव्हिड वॉर्नरवर बंदी घातली आणि त्याचे आयपीएल खेळण्याचे दरवाजेही बंद झाले. वॉर्नर नसल्यामुळे अखेर हैदराबादनं विलियमसनला कर्णधार केलं. वॉर्नर हैदराबादकडून खेळला असता तर विलियमसन हैदराबादच्या टीममध्येही बसला नसता. विलियमसननं मात्र या संधीचा पुरेपुर फायदा करून घेतला. विलियमसननं हैदराबादच्या टीमला फक्त फायनलमध्येच पोहोचवलं नाही तर या मोसमात त्यानं सर्वाधिक रन बनवण्याचा रेकॉर्डही केला आहे. या मोसमामध्ये विलियमसननं ७०० पेक्षा जास्त रन बनवले आहेत. आयपीएल इतिहासात आता विलियमसन तिसरा सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. केन विलियमसननं क्रिस गेल आणि माईक हसीचं रेकॉर्ड मोडलं आहे.
आयपीएल इतिहासात एका मोसमात विराट कोहलीनं सर्वाधिक रन केले आहेत. कोहलीनं २०१६ साली तब्बल ९७३ रन केले होते. त्याच मोसमात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं ८४८ रन केले होते. या यादीमध्ये आता विलियमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. विलियमसननं १७ मॅचच्या १७ इनिंगमध्ये १४२ च्या स्ट्राईक रेटनं ७३५ रन बनवले.
खेळाडू | रन | वर्ष |
विराट कोहली | ९७३ | २०१६ |
डेव्हिड वॉर्नर | ८४८ | २०१६ |
केन विलियमसन | ७३५ | २०१८ |
क्रिस गेल | ७३३ | २०१२ |
माईक हसी | ७३३ | २०१३ |