तिसऱ्या टी-२० आधी श्रीलंकेला झटका, महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत

दुसऱ्या टी-२०मध्ये भारताकडून पराभव पत्करावा लागलेल्या श्रीलंकेला दुसरा झटका लागला आहे.

Updated: Jan 8, 2020, 02:13 PM IST
तिसऱ्या टी-२० आधी श्रीलंकेला झटका, महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत title=

इंदूर : दुसऱ्या टी-२०मध्ये भारताकडून पराभव पत्करावा लागलेल्या श्रीलंकेला दुसरा झटका लागला आहे. ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये आधीच १-०ने पिछाडीवर पडलेल्या श्रीलंकेचा महत्त्वाचा खेळाडू इसरू उडानाला दुखापत झाली आहे. भारत-श्रीलंकेतली तिसरी टी-२० मॅच शुक्रवारी पुण्यात होणार आहे.

दुसऱ्या टी-२० दरम्यान इसरू उडानाला दुखापत झाल्याची माहिती श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी दिली आहे. मी डॉक्टर नाही, पण इसरू उडानाला बऱ्याच वेदना होत आहेत. त्याच्या वैद्यकीय चाचणीचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत, पण तो तिसरी टी-२० खेळण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी तो फिट होईल, अशी अपेक्षा आहे, असं मिकी आर्थर यांनी सांगितलं.

इसरू उडाना भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये खेळला होता. उडानाने बॅटिंगही केली, पण बॉलिंगला यायच्या आधी व्यायाम करताना उडानाला दुखापत झाली. उडानाची पाठ आणि कंबर दुखायला लागली. या दुखापतीमुळे उडानाने बॉलिंगही केली नाही. उडाना हा श्रीलंकेचा वनडे आणि टी-२० क्रिकेटमधला प्रमुख बॉलर आहे, तसंच तो मधल्या फळीतला उपयुक्त बॅट्समनही आहे.

इसरू उडानाची दुखापत हेदेखील श्रीलंकेच्या पराभवाचं एक कारण असल्याचं वक्तव्य श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने केलं होतं. उडानाने आतापर्यंत २९ टी-२० आणि १५ वनडे मॅच खेळल्या आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला. श्रीलंकेने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग केली. निर्धारित २० ओव्हरमध्ये श्रीलंकेने १४२/९ एवढा स्कोअर केला. भारताने श्रीलंकेचं हे आव्हान १५ बॉल बाकी असतानाच ३ विकेट गमावून पूर्ण केलं. फास्ट बॉलर नवदीप सैनीला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं. सैनीने ४ ओव्हरमध्ये १८ रन देऊन २ विकेट घेतल्या.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x