Ravi Shastri Message To Mumbai Indians Fans: भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची संघाचा नवा कर्णधार हार्दिक पंड्यासंदर्भात संयम ठेवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच मुंबई इंडियन्सच्या सामन्यांदरम्यान पंड्यासंदर्भातील मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची वर्तवणूक योग्य नसल्याचं सांगतानाच तातडीने हे असलं वागणं चाहत्यांनी थांबवायला हवं अशी अपेक्षा रवी शास्त्रींनी व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्सने 2024 च्या प्लेअर्स ट्रेडअंतर्गत गुजरात टायटन्सच्या संघाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला संघात सहभागी करुन घेतलं. मात्र पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने यंदाच्या पर्वातील त्यांचे पहिले तिन्ही सामने गमावेल आहेत. रवी शास्त्रींनी हार्दिकला पाठिंबा दर्शवला आहे.
हार्दिक पंड्याचं नेतृत्व चाहत्यांना फारसं पटलेलं नाही. मुंबईचा यंदाच्या पर्वातील पहिला सामना अहमदाबादमध्ये झाला. त्या सामन्यात मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिकची हुर्यो उडवली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही हार्दिकला मैदानातील चाहत्यांनी ट्रोल केलं. रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील मैदानात झालेल्या राजस्थान विरुद्धच्या सामन्यात होम ग्राऊण्डवरही चाहत्यांनी हार्दिकची हुर्यो उडवली. मात्र हे सारं रवी शास्त्रींना पटलेलं नसून त्यांनी चाहत्यांच्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे. काहीही झालं तरी हार्दिक हा संघाचा नवा कर्णधार आहे. तसेच चाहत्यांनी हे ही लक्षात घेतलं पाहिजे की हा अष्टपैलू खेळाडू 'तुमच्यासारखा माणसूच आहे,' असं रवी शास्त्रींनी चाहत्यांना सांगितलं आहे.
"तुम्ही अनेक वर्ष संघाला पाठिंबा दिला. अगदी 2-3 सामन्यांमध्ये मुंबईचा संघ काही वाईट संघ होणार नाही. हा संघ 5 वेळा जेतेपद पटकावलेला संघ आहे. संघाला नवा कर्णधार मिळाला म्हणून काय झालं. थोडा संयम ठेवा. तुम्ही हात धुवून ज्याच्या मागे लागला आहे तो सुद्धा तुमच्यासारखा एक माणूसच आहे. सगळ्या गोंधळानंतर त्यालाही रात्री सुखाने झोप लागली पाहिजे. याबद्दल थोडा विचार करा आणि शांत व्हा," असा सल्ला रवी शास्त्रींनी 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलताना मुंबईच्या चाहत्यांना दिली.
नक्की पाहा >> चौकार रोखण्यासाठी बॉलमागे पळाले 5 खेळाडू! Video पाहून म्हणाल, 'क्रिकेट आहे की लगान?'
"हार्दिकला सल्ला द्यायाचं झालं तर इतकेच सांगेल की त्या संयम ठेवावा, दुर्लक्ष करावं आणि आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावं. मागील काही सामने चांगले गेले नाहीत पण हा फार उत्तम संघ आहे. ते 3-4 सामने जिंकल्यानंतर लोक सारं विसरुन जातील. तुम्ही नक्कीच जिंकाल आणि परिस्थिती नक्कीच बदलेल," असं रवी शास्त्रींनी हार्दिक आणि मुंबईच्या संघाला सल्ला देताना सांगितलं. रवी शास्त्रींनी या माध्यमातून ट्रोलिंगचा शिकार होणाऱ्या हार्दिकला पाठिंबा दिला आहे.