Shami Questions Hardik Pandya MI Captaincy: रोहित शर्माकडून कर्णधारपदाचा भार स्वीकारल्यानंतर हार्दिक पंड्याला आयपीएल 2024 ची मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून म्हणावी तशी सुरुवात करता आली नाही. पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सविरुद्धचा पहिलाच सामना मुंबईने 6 धावांनी गमावला. अवघ्या 169 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ लक्ष्यापासून 6 धावा दूर राहिला. हार्दिक पंड्याच्या खांद्यावर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. मात्र त्याने 4 चेंडूंमध्ये 11 धावा केल्या आणि तो 5 व्या चेंडूवर बाद झाला. मात्र पंड्या अगदी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला हे कोडं अनेकांना उमगलेलं नाही. भारतीय संघातील हार्दिकचा सहकारी आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही पंड्याने एवढ्या उशीरा फलंदाजीला येण्याचा निर्णय अगदीच अनाकलनीय वाटला.
"डावखुरा आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाजांची जोडी असावी असं अनेकदा बोललं जातं. मात्र मला हे असं का म्हणतात कळत नाही. मागील सामन्यामध्येही आपण पॅट कमिन्स किती समजदार आहे याबद्दल बोललो. तुम्हाला एक पाऊल पुढचा विचार करावा लागतो. मी कर्णधार आहे मी ही जबाबदारी स्वीकारायला हवी, असा विचार तुम्ही केला पाहिजे," असं शमी म्हणाला. हार्दिकबद्दल बोलताना शमीने, "हार्दिक बद्दल बोलायचे झाल्यास त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तो गुजरात टायटन्ससाठी चौथ्या क्रमांकावरही खेळला आहे. त्याला मुंबईकडून खेळताना चौथ्या किंवा पाचव्या क्रमाकांवर फलंजादी करण्यास काय अडचण होती? तो सातव्या क्रमांकाला फलंदाजी करत असेल तर तो तळाचा फलंदाज ठरतो," असं शमीने 'क्रिकबझ'शी बोलताना सांगितलं.
"तुम्ही सातव्या क्रमांकावर फलंदाजी करता तेव्हा तुम्ही फार दबावामध्ये मैदानात येतात. मला वाटतं हार्दिकने आधीच फलंदाजीसाठी यायला हवं होतं. असं झालं असतं तर सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलाच नसता," असं शमी म्हणाला.
नक्की वाचा >> गंभीरचं कौतुक ऐकून गावसकर संतापले! थेट नाव घेत म्हणाले, 'पुढील काही सामन्यांमध्ये...'
हार्दिक धोनीची स्टाइल फॉलो करतोय का? असा प्रश्न मुलाखतकाराने विचारला. त्यावर शमीने अगदीच फटकळ शब्दामध्ये उत्तर दिलं. "धोनी हा धोनी आहे. तुम्ही त्याची तुलना कोणाशी करु शकत नाही. प्रत्येकाची विचारसणी वेगवेगळी असते, मग तो कोहली असो किंवा धोनी. तुम्ही तुमच्या कौशल्याच्या जोरावर सामन्यात टिकून राहणं महत्त्वाचं असतं. तुम्ही मागील 2 पर्वांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तुम्हाला त्या स्थानावर फलंदाजी करण्याची सवय आहे. तुम्ही किमान पाचव्या क्रमांकावर तरी फलंदाजीला यायला हवं होतं. सातवर तर नक्कीच नाही," असं शमी म्हणाला.
नक्की वाचा >> ...अन् त्यानंतर ड्रेसिंग रुममधील प्रत्येकजण रडू लागला; CSK च्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
याच चर्चेत सहभागी झालेल्या मनोज तिवारीने हार्दीकने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला यावं हा निर्णय केवळ त्याने एकट्याने घेतला नव्हता असं नमूद केलं. "मला वाटतं तो त्याचा निर्णय़ नव्हता. गुजरातच्या संघात केवळ 2 जण संपूर्ण खेळावर नियंत्रण ठेवायचे, हार्दिक आणि नेहरा! मुंबईच्या डगआऊटमध्ये अनेक मोठी नवं हजर आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीतरी त्याला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला जाण्याचं सुचवलं असेल कारण तो संघ तिलक वर्मा आणि ब्रेवीस सारख्या तरुणांवर फार विश्वास ठेवतो. मार्क बाऊचर नक्कीच सचिनचं म्हणणं ऐकणार. त्यानंतर तो संघातील इतर सहकऱ्यांशी आणि संघ व्यवस्थापनाशी बोलून निर्णय घेत असावा," असं तिवारी म्हणाला.