IPL 2024 Auction Top Indian Players: इंडियन प्रीमिअर लीगच्या 2024 च्या पर्वासाठी नुकताच लिलाव पार पडला. या लिलावामध्ये 24 कोटी 75 लाख रुपयांची बोली मिचेल स्टार्कला मिळाली. कोलकात्याने हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा सौदा केला. त्यापूर्वी पॅट कमिन्सला तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजून सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात घेतलं होतं. असं असतानाच आता भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज विराट कोहली लिलावामध्ये असता तर किती पैसे त्याच्यासाठी मोजावे लागले असते याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. याच चर्चेमध्ये विद्यमान समालोचक आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने उडी घेतली असून त्याने विराटला किती रक्कम लिलावात मिळाली असती याबद्दलच मत वक्त केलं आहे.
जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या 2024 च्या पर्वासाठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी पार पडला. दुबईमध्ये पार पडलेल्या या लिलावामध्ये अनेक नवाजलेल्या क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पडला. ऑस्ट्रेलियाच्या 2 वेगवान गोलंदाजांसाठी तर 20 कोटींहून अधिकची बोली लागली. ऑस्ट्रेलियन संघाला वर्ल्ड कप 2023 मध्ये जेतेपद मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सला विक्रमी किंमत मिळाली आहे. पॅट कमिन्सला तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजून सनरायझर्स हैदराबादच्या संघाने करारबद्ध केलं आहे. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने 20 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अर्थात अर्ध्या तासामध्ये पॅट कमिन्सचा सर्वाधिक बोलीचा विक्रम त्याचा संघ सहकारी मिचेल मार्शने मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. ऑस्ट्रेलियन संघाला एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग असलेल्या मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाइट रायडर्सने तब्बल 24 कोटी 75 लाख रुपये मोजले. आयपीएलच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी बोली ठरली. याचसंदर्भात आकाश चोप्रा बोलत होता.
पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला मिळेली बोली पाहून आकाश चोप्राने भारतीय क्रिकेटपटूंना नक्कीच अधिक रक्कम मिळाली पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. 2008 पासून विराट कोहली बंगळुरु रॉयल चॅलेंजर्ससाठी खेळत आहे याकडे आकाश चोप्राने लक्ष वेधलं. तसेच विराटचा लिलाव झाला तर संघांनाच त्यांची पर्चेसिंग पॉवर म्हणजेच खरेदी करण्याची क्षमता वाढवावी लागेत असं आकाश चोप्रा म्हणाला आहे. विराट कोहलीला लिलावामध्ये उतरवल्यास तो सर्व विक्रम मोडून टाकेल असा विश्वास व्यक्त करतानाच विराट मागील दशकभरातून अधिक काळापासून क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण करण्यास यशस्वी ठरल्याच्या मुद्द्याकडे आकाश चोप्राने लक्ष वेधलं.
"आयपीएलमधील संघांना खरेदीसाठीची मर्यादा 200 कोटी करायला हवी. त्यापैकी 150 कोटी भारतीय खेळाडूंसाठी राखीव हवेत. उरलेले 50 कोटी परदेशी खेळाडूंसाठी राखीव असावेत. विराट कोहलीचा लिलाव झाला तर त्याच्यावर 42 कोटींची आरामात लागेल, असं आकाश चोप्राने म्हटल्याचं वृत्त 'क्रिकेट टू डे'ने दिलं आहे. आकाश चोप्राने भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा परदेशी क्रिकेटपटूंना अधिक रक्कम मिळत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना, "यालाच कलयुग म्हणावं का?" असा प्रश्न विचारला होता.
आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ही नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएलच्या लिलावामध्ये जसप्रीत बुमराह, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंपेक्षा पैसे मिळतात हे खेदजनक असल्याचं आकाश चोप्रा म्हणाला आहे.
"मिचेल स्टार्क 24 कोटी 75 लाख रुपये, पॅट कमिन्सला 20 कोटी 50 लाख रुपये मिळालेत. तर जसप्रीत बुमराहला 12 कोटी, धोनीला 12 कोटी, विराटला 17 कोटी (खरी रक्कम 15 कोटी) आणि रोहित शर्माला 16 कोटी मिळतात. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, सॅम करन, कॅमरॉन ग्रीन हे सर्व या खेळाडूंपेक्षा महागडे आहेत. यालाच कलयुग म्हणायचं का?" असा सवाल चोप्राने उपस्थित केला आहे. "टी-20 मध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज कोण आहे? आयपीएलमध्ये अव्वल गोलंदाज कोण आहे? या खेळाडूचं नाव जसप्रीत बुमराह आहे. बुमराहला 12 कोटी आणि स्टार्कला 25 कोटी. हे चुकीचं आहे. प्रत्येकाला जेवढी क्षमता आहे तेवढा पैसा मिळाला पाहिजे. मात्र सध्या जे घडतंय ते चुकीचं आहे," असं चोप्राने स्पष्टपणे सांगितलं.
आपल्या संघाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना योग्य किंमत आयपीएलमध्ये मिळत नाही असंही चोप्रा म्हणाला. बुमराह आणि विराटसारख्या खेळाडूंचा लिलाव झाला तर त्यांना सहज 35 कोटींहून अधिक रक्कम मिळेल, असा विश्वास चोप्राने व्यक्त केला.