शारजा : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्से (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. राजस्थानन दिेलेले 91 धावांचे आव्हान मुंबईने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 8.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईकडून ईशान किशनने (Ishan Kishan) नाबाद 50 धावांची विजय खेळी साकारली. तर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 22 धावांची धमाकेदार खेळी साकारली. (ipl 2021 rr vs mi captain rohit sharma becomes 1st asian batsman who completed 400 sixes in t 20 cricket)
विजयी धावांचं पाठलाग करायला आलेल्या ईशान आणि रोहित या सलामी जोडीने 23 धावांची आश्वासक भागीदारी केली. या 23 पैकी 22 धावा या एकट्या रोहितने झोडल्या. यानंतर रोहित बाद झाला. रोहितने या 22 धावांच्या खेळीत 1 फोर आणि 2 सिक्स ठोकले. या 2 सिक्ससह रोहितने अनोखा कारनामा केला. रोहित अशी कामगिरी करणारा आशिया खंडातला पहिलाच फलंदाज ठरला आहे.
रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये 400 सिक्स पूर्ण करण्याचा कारनामा केला आहे. रोहितने 355 व्या टी 20 सामन्यात हा टप्पा पूर्ण केला आहे. यासह रोहित 400 किंवा त्यापेक्षा जास्त सिक्स लगावणारा सातवा फलंदाज ठरला आहे.
सर्वाधिक सिक्स कोणाच्या नावे?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम हा युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने आतापर्यंत 448 सामन्यांमध्ये 1 हजार 42 सिक्स ठोकले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानीही विंडिजचेच खेळाडू आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड आहे. पोलार्डने 758 खेचले आहेत. तर आंद्रे रसेल 510 सिक्ससह तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत.
400 सिक्स पूर्ण करणारे फलंदाज (Most Sixes In T20 Cricket)
ख्रिस गेल - 1 हजार 42 सिक्स
कायरन पोलार्ड - 758 सिक्स
आंद्रे रसेल - 510 सिक्स
ब्रँडन मॅक्युलम - 485 सिक्स
शेन वॉटसन - 467 सिक्स
एबी डी व्हीलीयर्स - 434 सिक्स
रोहित शर्मा - 400 सिक्स
मुंबईच्या आशा कायम
दरम्यान राजस्थानचा मोठ्या फरकाने पराभव केल्याने मुंबईच्या पलटणच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. साधारणपणे प्लेऑफमध्ये धडक मारण्यासाठी 16 पॉइंट्सची आवश्यकता असते. मात्र मुंबईने या मोसमात निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे मुंबईचं प्लेऑफमधील समीकरण हे इतर संघांच्या सामन्याच्यान निकालावर आणि नेट रनरेटवर आधारित आहे.
मुंबईने राजस्थान विरुद्धच सामना हा 72 चेंडू शिल्लक ठेवून जिंकला. त्यामुळे मुंबईला नेट रनरेटमध्ये फायदा झाला. त्यामुळे आता प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला हैदराबाद विरुद्ध होणारा साखळी फेरीतील अखेरचा सामनाही मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. यामुळे या सामन्यात काय निकाल लागणार, याकडे 'पलटण'चं लक्ष असणार आहे.