मुंबई: वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना झाला. या सामन्यात विराटसेनेनं एक हातीसामना जिंकला आहे. देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार विराट कोहलीला तुफानी जलवा या सामन्यात पाहायला मिळाला. RCBने 10 विकेट्सने हा सामना जिंकला आहे.
बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थान संघाला एकामागे एक धक्के बसले. डेव्हिड मिलर तर मैदानात उतरताच तंबुत परतला तर संजू सॅमसनने केवळ 21 धावा केल्या. राजस्थान संघाने 178 धावांचं लक्ष्य बंगळुरू संघाला दिलं.
बंगळुरू संघाने या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या गोलंदाजांवर दोनच फलंदाज भारी पडल्याचं पाहायला मिळालं. देवदत्त पडिक्कलनं 101 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीनं 72 धावांची खेळी केली. पुन्हा एकदा या या दोघांचाही जलवा मैदानात पाहायला मिळाला. RCB संघ पुन्हा एकदा पॉइंट टेबलवर पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
देवदत्त पडिक्कल IPL सुरू होण्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पहिला सामना तो खेळू शकला नव्हता. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात 11 धावा केल्या होत्या. देवदत्तने अजून एक विक्रम केला आहे.
IPLच्या इतिहासात चौदाव्या हंगामात 18 व्या सामन्यात शतक करणारा 18 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. IPLमध्ये देवदत्त पाडिक्कल हा शतक ठोकणारा 37 वा खेळाडू आहे. आतापर्यंत 18 भारतीय आणि 19 परदेशी खेळाडूंनी शतके ठोकली आहेत. सर्वाधिक शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. विराट कोहली 5 शतकांसह दुसर्या क्रमांकावर आहे.