मुंबई: दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना अत्यंत रोमांचक झाला. दिल्ली संघाला मात्र कोलकाताला विजयापासून रोखता आलं नाही. कोलकाता संघाच्या विजयानंतर दिनेश कार्तिकवर BCCI कडून कारवाई करण्यात आली आहे. दिनेश कार्तिकने मैदानात केलेल्या कृतीवरून बीसीसीआय नाराज आहे. त्याने नियमाचं उल्लंघन केल्याचं म्हणत त्याला शिक्षा देण्यात आली आहे.
कोलकाताच्या डावातील 18 वी ओव्हर कगिसो रबाडा टाकत होता. ओव्हरमधील शेवटच्या म्हणजेच 6 व्या चेंडूवर कार्तिकने अकॉर्स द लाईन जावून खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयोग फसला. कार्तिक क्लिन बोल्ड झाला. त्याला राग अनावर झाला. यामुळे त्याने हात मारत स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला.
क्रिकेटच्या नियमांनुसार, कार्तिकच्या या कृत्यामुळे नियमांचं उल्लंघन झालं. त्यामुळे बीसीसीआयने त्याला दणका दिला. कार्तिकने लेव्हल 1नियमांच्या उपकलम 2.2 चं उल्लंघन केलं. कार्तिकने चूक मान्य केली. तसेच जो काही दंड असेल, तो भरण्यासही त्याने सहमती दर्शवली आहे. लेव्हल 1 च्या नियमांमध्ये सामनाधिकाऱ्याचा (Match Refree) निर्णय अंतिम असतो. सामना हा नियमांनुसार खेळवला जातो की नाही, याकडे लक्ष देण्याची जबाबदारी ही सामनाधिकाऱ्याची असते.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लीक करा
दिनेश कार्तिकने IPL 2021 मध्ये एकूण 16 सामने खेळले. या सामन्यांमध्ये मिळून त्याने आतापर्यंत 214 धावा केल्या आहेत. दिल्ली विरुद्ध झालेल्या रोमांचक लढतीत कोलकाताने दिल्लीवर 3 विकेट्स राखून विजय मिळवला. राहुल त्रिपाठीने आर अश्विनच्या बॉलवर लांब सिक्स ठोकून कोलकाता संघाला विजय मिळवून दिला. ज्यामध्ये व्यंकटेश अय्यरने मॅचविनिंग इनिंग खेळली. अंतिम फेरीत कोलकाताचा सामना 3 वेळा चॅम्पियनशिप मिळवलेल्या चेन्नईशी होणार आहे.
कोलकाता तिसऱ्यांदा अंतिम फेरीत गेला आहे. त्याचबरोबर चेन्नईची ही 9 वी फायनल आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात कोलकाताच्या विजयाचा नायक म्हणून उदयास आलेल्या व्यंकटेश अय्यरने दमदार पदार्पण केलं. शुभमन गिलने संयमी खेळी खेळून आपल्या संघाला अंतिम फेरीत नेलं. कोलकातासाठी वरुण चक्रवर्तीने अतिशय किफायतशीरपणे गोलंदाजी केली आणि दोन विकेट्सही घेतल्या. सुनील नरेननेही चांगली गोलंदाजी केली.