बंगळुरू : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १७ रननी विजय झाला. या मॅचमध्ये विजय झाला असला तरी बंगळुरूच्या टीमला मोठा झटका बसला आहे. बंगळुरूच्या टीमला विजयाच्या पटरीवर आणणारा डेल स्टेन दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. दुखापतीमुळे स्टेन बुधवारी पंजाबविरुद्ध झालेल्या मॅचमध्येही खेळू शकणार नाही. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे आता स्टेन या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.
३५ वर्षांच्या स्टेनला बंगळुरूने नॅथन कुल्टर नाईलऐवजी टीममध्ये घेण्यात आलं होतं. डेल स्टेन जेव्हा बंगळुरूच्या टीममध्ये दाखल झाला तेव्हा एक विजय आणि ७ पराभवासोबत बंगळुरू पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होती. स्टेन टीममध्ये आल्यानंतर बंगळुरूच्या विजयाला सुरुवात झाली. स्टेनने खेळलेल्या दोन्ही मॅचमध्ये बंगळुरूचा विजय झाला. या दोन्ही मॅचमध्ये स्टेनने दोन-दोन विकेट घेतल्या.
बंगळुरू टीमचे चेअरमन संजीव चुरीवाला म्हणाले, 'स्टेनच्या खांद्याला दुखापत झाली आहे. यामुळे तो आयपीएलच्या उरलेल्या मॅचमध्ये खेळणार नाही. स्टेनच्या उपस्थितीमुळे आमचा फायदा झाला. स्टेनने टीममध्ये आणलेल्या उत्साहाबद्दल धन्यवाद. टीमला त्याची कमी जाणवेल. तो लवकरच या दुखापतीतून बरा होईल, अशी अपेक्षा आहे.'
डेल स्टेन हा दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कपसाठीच्या टीमचा हिस्सा आहे. त्यामुळे त्याची दुखापत लवकर बरी होईल, अशी आशा क्रिकेट दक्षिण आफ्रिका करत आहे. ३० मेरोजी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्ल्ड कपचा पहिला सामना होणार आहे.