INDvsAUS: भारतासाठी खुशखबर, हार्दिक पांड्याचं टीममध्ये पुनरागमन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत आहे.

Updated: Dec 17, 2018, 08:37 PM IST
INDvsAUS: भारतासाठी खुशखबर, हार्दिक पांड्याचं टीममध्ये पुनरागमन title=

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत आहे. त्यातच आता भारतीय टीमसाठी आनंदाची बातमी आहे. ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. अतिरिक्त खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. भारतीय टीममध्ये निवड होणारा पांड्या हा १९वा खेळाडू आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय निवड समितीनं १८ जणांची निवड केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी टेस्ट २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये तर चौथी टेस्ट पुढच्या वर्षी ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवली जाईल. या दोन्ही टेस्टमध्ये हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता आहे.

हार्दिकची रणजीमध्ये शानदार कामगिरी

हार्दिक पांड्यानं रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळताना मुंबईविरुद्ध मॅचमध्ये ७ विकेट घेतल्या आणि अर्धशतकही केलं. पांड्यानं घेतलेल्या ७ विकेटपैकी ५ विकेट या एका इनिंगमध्येच आल्या होत्या.

पृथ्वी शॉऐवजी मयंक अग्रवालला संधी

भारतीय टीमचा ओपनर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे संपूर्ण सीरिजला मुकणार आहे. पृथ्वी शॉच्याऐवजी मयंक अग्रवालची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ विरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना पृथ्वी शॉला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना शॉच्या पावलाला दुखापत झाली. मेलबर्नमध्ये २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठी शॉ फिट होईल, अशी अपेक्षा भारतीय टीमनं व्यक्त केली होती. पण भारतीय टीमची ही अपेक्षा फोल ठरली आहे.

भारतावर पराभवाचं सावट

भारताविरुद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या टेस्टमध्ये शानदार पुनरागमन केलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ११२/५ असा झाला आहे. दिवसाअखेर हनुमा विहारी २४ रनवर नाबाद तर ऋषभ पंत ९ रनवर नाबाद खेळत आहेत. या मॅचमध्ये जिंकण्यासाठी भारताला अजूनही १७५ रनची आवश्यकता आहे. पण भारताची ही अवस्था बघता ऑस्ट्रेलियाच ही मॅच पाचव्या दिवशी जिंकेल हे जवळपास स्पष्ट आहे.

पांड्याच्या अनुपस्थितीमुळे भारताची अडचण

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला फास्ट बॉलिंग करु शकणाऱ्या ऑलराऊंडरची कमी जाणवत आहे. पर्थच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत ४ फास्ट बॉलर १ विकेट कीपर आणि ६ बॅट्समन घेऊन मैदानात उतरला आहे. पण जर हार्दिक पांड्यासारखा खेळाडू टीममध्ये असता तर भारत ३ फास्ट बॉलर, एक ऑलराऊंडर आणि २ स्पिनर घेऊन मैदनात उतरू शकला असता. यामुळे भारतीय टीममध्ये संतुलन आलं असतं, याचबरोबर बॉलिंगमध्ये वेगळेपणही दिसलं असतं.

स्पिन ऑलराऊंडर कामाचा नाही

भारतीय टीममध्ये सध्या रवींद्र जडेजाच्या रुपात स्पिन ऑलराऊंडर आहे. पण ऑस्ट्रेलियातल्या फास्ट बॉलरना अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर रवींद्र जडेजाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. त्यामुळे हार्दिक पांड्याची कमी भारतीय टीमला नक्कीच जाणवत आहे.