विराट एक अविश्वसनीय खेळाडू, इंग्लंडच्या खेळाडूकडून स्तुतीसुमनं

आणखी एका खेळाडूने त्याची प्रशंसा केली आहे.

Updated: Jan 30, 2019, 11:17 AM IST
विराट एक अविश्वसनीय खेळाडू, इंग्लंडच्या खेळाडूकडून स्तुतीसुमनं title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या कारकिर्दीचा उंचावता आलेख आणि मैदानावर, क्रीडा विश्वात त्याचा एकंदर वावर पाहता तो एक अविश्वसनीय खेळाडू असल्याचं म्हणत आणखी एका खेळाडूने त्याची प्रशंसा केली आहे. तो खेळाडू म्हणजे इंग्लंडच्या संघातील वेगवान गोलंदाज टॉम कुरान. 

आयसीसीकडून मंगळवारी पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेची घोषणा  केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्याने हे वक्तव्य केलं. आगामी टी20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ एकाच गटात खेळणार आहेत. त्याव्यतिरिक्त या गटात अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इतरही दोन संघांचा समावेश आहे. ते दोन संघ कोणते हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. 

याच धर्तीवर कोहलीसमोर गोलंदाजी करण्याविषयीचा प्रश्न ज्यावेळी कुरानपुढे ठेवत, तू कशा प्रकारे बाद करशीच असंही विचारण्यात आलं. त्यावेळी, 'नो बॉलने नक्कीच नाही... बघू आपण.... कारण विराट हा एक अविश्वसनीय खेळाडू आहे', असं तो म्हणाला. कुरानने विराटविषयी केलेलं हे वक्तव्य पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात खेळाडूंमध्ये असणाऱ्या विराटच्या चाहत्यांच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे असंच म्हणावं लागेल. 

पुढच्या वर्षी १८ ऑक्टोबरपासून १५ नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये खेळण्यासाठी २३ वर्षीय कुरान फारच उत्सुक असल्याचं कळत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्चचषक खेळणं ही फारच उत्साहाची बाब असल्याचं म्हणत या ठिकाणची क्रिकेट मैदानं आणि जगात असणारी त्यांची लोकप्रियता पाहता एका अद्वितीय स्पर्धेत सहभागी होणं, हा माहोल अनुभवणं ही बाबही आपल्यासाठी फार महत्त्वाची असल्याचंही तो म्हणाला.