गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यातली पहिली टी-२० मॅच रद्द करण्यात आली. पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे हा सामना सुरुच होऊ शकला नाही. पावसामुळे हा सामना रद्द झाला असं सांगण्यात येत असलं, तरी आता सामना रद्द व्हायचं दुसरं कारण आता समोर येत आहे. मैदानातल्या कर्मचाऱ्यांनी कव्हर्स काढताना केलेल्या चुकीमुळे हा सामना होऊ शकला नाही.
या मॅचमध्ये टॉसपर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं. पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली नव्हती, पण मॅच सुरु व्हायच्या काही क्षण आधीच पाऊस सुरु झाला. यानंतर पुढचा दीड तास पावसाचा खेळ सुरु राहिला. २ तासांनी पाऊस थांबला तेव्हा वेगळीच अडचण समोर आली.
मॅच सुरु व्हायच्या निर्धारित वेळेनंतर ४५ मिनिटं पाऊस सुरु होता. यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतर अंपायर ९ वाजता खेळपट्टीची पाहणी करणार होते. पाऊस थांबल्यानंतर मैदानातल्या कर्मचाऱ्यांनी कव्हर्स हटवले. यावेळी कव्हर्सवर साठलेलं पाणी खेळपट्टीवर सांडलं. यानंतर खेळपट्टी सुकवण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर आणि ड्रायरचा वापर करण्यात आला, पण याचा फायदा झाला नाही.
मॅच सुरु व्हायच्या काही क्षण आधी पावसाला सुरुवात झाली. जवळपास १५ मिनिटं जोरात पाऊस आला, पण यानंतर पावसाचा जोर कमी झाला. ७.३० वाजेपर्यंत पाऊस कमी झाला तरी थांबला मात्र नाही. ७.४५-७.५० च्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर कव्हर्स हटवण्यात आली.
पाऊस थांबल्यानंतर ८.१५ वाजता खेळपट्टीची पाहणी होणार होती, पण पुन्हा पाऊस सुरु झाला आणि खेळपट्टीवर पुन्हा कव्हर्स टाकण्यात आली. १० मिनिटांनी पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळपट्टीवर कामाला सुरुवात झाली. ९ वाजता अंपायर मैदानात आले पण खेळपट्टी पाहून त्यांचं समाधान झालं नाही. अखेर ९.३० वाजता पुन्हा एकदा खेळपट्टीची पाहणी करण्याचं ठरलं.
कमीत कमी ५ ओव्हरची मॅच होण्यासाठी ९.४६ वाजेपर्यंत मॅच सुरु होणं अपेक्षित होतं. पण खेळपट्टीवरच्या पाण्यामुळे हा सामना होऊ शकला नाही. ९.४६ वाजल्यानंतर १० मिनिटांनी मॅच रद्द झाल्याचं घोषित करण्यात आलं.
फक्त एका चुकीमुळे भारत-श्रीलंकेतली पहिली टी-२० रद्द