मौका मौका! भारत विरुद्ध पाकिस्तान टी 20 सीरिजवर BCCIच्या अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य

भारत विरुद्ध पाकिस्तान टी 20 सामना होणार की नाही? BCCIचे अधिकारी काय म्हणाले...

Updated: Mar 27, 2021, 04:07 PM IST
मौका मौका! भारत विरुद्ध पाकिस्तान टी 20 सीरिजवर BCCIच्या अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य title=

मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा मैदानात भिडणार असल्याच्या चर्चा आता केवळ सोशल मीडियावरच नाही तर जगभरात सुरू झाल्या आहेत. भारत-पाकिस्तान सुरू असलेल्या तणावादरम्यान टी 20 सीरिज होणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. तर पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी टी 20 सीरिज खेळवली जाणार असल्याचं वृत्तही दिलं होतं. 

भारत विरुद्ध पाकिस्तान 2012-13मध्ये शेवटचा सामना खेळण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा 8 वर्षांनी हा सामना खेळवण्यात येईल अशी चर्चा आहे. मात्र ICCने यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतल्याची माहिती मिळाली नाही. 

दोन्ही देशांमध्ये शेवटची टी -20 मालिका आणि वन डे मालिका डिसेंबर 2012 मध्ये खेळली गेली होती. टी -२० मालिका 1-1 अशी बरोबरी झाली. पाकिस्तानने वनडे मालिका 2-1 ने जिंकली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी -20 वर्ल्ड कपच्या आसपास तीन सामन्यांची टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त पाकिस्तानातील स्थानिक मीडियानं दिलं होतं. 

बीसीसीआयचे अधिकारी राजीव शुक्ला भारत विरुद्ध पाकिस्तान टी 20 मालिकेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव सध्या नाही असं म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. 

आतापर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही प्रस्तावावर चर्चा झाली नाही. भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून संकेत मिळत नाहीत तोपर्यंत तरी दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळवण्याचा सध्या तरी प्रस्ताव नाही. राजीव शुक्ला यांनी या संपूर्ण चर्चांना खोडून काढत पूर्णविराम दिला आहे. 

दुसरीकडे पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट अत्यंत महत्त्वाचे आहे. या सामन्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सुधारू शकतात असंही शाहिद आफ्रिदी यांचं म्हणणं आहे.