Report Card : कोहली-शास्त्री जोडीने मिळून भारतीय क्रिकेटला काय दिलं?

भारतीय क्रिकेटमधील एक अध्याय आज संपणार आहे

Updated: Nov 8, 2021, 08:42 PM IST
Report Card : कोहली-शास्त्री जोडीने मिळून भारतीय क्रिकेटला काय दिलं? title=
दुबई : भारतीय क्रिकेटमधील (India Cricket) एक अध्याय आज संपणार आहे. कोहली-शास्त्री (Kohli-Shastri) युगाचा आज शेवट होणार असून विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय संघ (Team India) अखेरचा टी20 (T20) सामना खेळणार आहे. तर आज मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचीही कारकिर्द संपणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर (ICC T20 World Cup) भारतीय टी-20 संघाला नवा कर्णधार आणि टीम इंडिया नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे.

रवि शास्त्री यांचं रिपोर्ट कार्ड

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू, समालोचक आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असा रवी शास्त्री यांचा प्रवास होता. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. पण त्यांचा रेकॉर्ड अगदीच खराब होता, असं म्हणता येणार नाही. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. अशी कामगिरी करणारा भारत पहिला आशियाई देश ठरला होता. यानंतर 2020-21 मध्ये भारताने आणखी एक क्रिकेट मालिका आपल्या नावावर केली.
 
न्यूझीलंडला 5-0 ने पराभूत करताना द्विपक्षीय मालिकेतील सर्व 5 T20 सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ होता. याशिवाय भारताने घरच्या मैदानावर सात कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला. भारताने कसोटी प्रकारात अव्वल स्थान गाठलं आणि इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
फॉर्मेट सामने विजय पराभव ड्रॉ टाई/निकाल नाही
कसोटी 43 25 13 5 0
एकदिवसीय 76 51 22 0 2/1
T20I 64 42 18 0 2/2
एकूण 183 118 53 5 4/3

 

कोहलीच्या नेतृत्वात टी20त टीम इंडियाची कामगिरी
 
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीमं इंडिया आतापर्यंत 49 टी20 सामने खेळला आहे. यापैकी 29 सामन्यात विजय मिळवलाय, तर 16 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. चार सामन्यांचा निकाल लागला नाही. कर्णधार म्हणून विराट कोहलीने टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक 1489 धावा केल्या. टी20मध्ये विराट कोहली एमएस धोणीनंतर सर्वात यशस्वी कर्धणार ठरला आहे.
 
विराट कोहली एकमेव भारतीय कर्णधार आहे ज्याने टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाला त्यांच्या देशात हरवण्याची किमया केली आहे. भारताने न्यूझीलंडमध्ये 5-0असा दणदणीत विजय मिळवला होता. तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेलाही धूळ चारली. विराटची संघनिवड, पक्षपातीपणा आणि मैदानावरील त्याची आक्रमक वृत्ती याबद्दल बरीच चर्चा झाली. पण, आकडेवारीचा विचार केला तर तो भारताच्या आजवरच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.
 

ICC ट्रॉफी न जिंकल्याची खंत

विराट कोहलीला एका गोष्टीची मात्र नेहमीच खंत असेल. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध पराभव, 2019 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला होता.