अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारत विजयापासून अवघे काही पावलं दूर आहे. चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी आता भारत फक्त 4 विकेट दूर आहे. रविचंद्रन अश्विनने बाद केल्यावर इंग्लंडचा कर्णधार जो रूट पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रूटला केवळ 30 धावा करण्यात यश आलं.
भारतीय संघाने पहिल्याच डावात 160 धावांची आघाडी घेतली होती. आता दुसरा डाव सुरू आहे. भारतीय गोलंदाजांना इंग्लंड संघाचे 6 गडी बाद करण्यात यश मिळालं आहे. हा सामना जिंकला तर भारतीय संघ भारत विरुद्ध इंग्लंड पूर्ण सीरिज जिंकणार आहे.
अक्षर पटेलला ओली पॉपला बाद करण्यात मोठं यश आलं. त्यानं दुसऱ्या डावात 3 गडी बाद केले. तर बेन टोक्सलाही तंबूत धाडण्यात त्याला मोलाचा वाटा आहे. डॉमिनिक सिबलीलाही अक्षरनं बाद केलं आहे. भारतीय गोलंदाजांच्या यशस्वी कामगिरीमुळे अवघ्या काही पावलं भारतीय संघ विजयापासून दूर आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची मालिकेवरील पकड अधिक मजबूत होत असल्याचं दिसत आहे. तर वॉशिंग्टन सुंदरचं शतक अवघ्या 4 धावांसाठी हुकलं आहे. भारतीय संघाने 365 धावा केल्या आहेत. 160 धावांनी भारतीय संघ पहिल्या डावात आघाडीवर आहे. भारतानं 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकला तर मालिकेत भारताचा विजय होईल आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामना खेळण्याची संधी भारतीय संघाला मिळू शकेल.