मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड आज दुसरा वन डे सामना खेळवला जात आहे. या सामन्याआधी एका खेळाडूनं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचण्याचा आणि त्याचं मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंडच्या क्रिकेटपटूनं विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या क्रिकेट मैदानावरच्या वागण्याविषयी इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने मोठे विधान केले आहे. आक्रमक हावभाव आणि त्याचं वर्तन टीम इंडिया आणि त्याच्यासाठी अनुकूल असलं तरी इंग्लंडच्या संघासाठी ते योग्य वाटत नाही.
विराट कोहलीनं धावा काढणं आमच्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे तो जेवढा कमी धावा करेल ते आमच्याबाजूनं फायद्याचं ठरतं असंही यावेळी इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्स म्हणाला. प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू मैदानावर एक विशिष्ट प्रकारे वागत असतो. त्य़ाच्या वर्तनातून खेळातून संघाला प्रेरणा आणि जिंकण्याची उर्जा मिळेल असं हे वर्तन असतं. गेल्या चार-पाच वर्षांत ही पद्धत आमच्यासाठी अनुकूल राहिलेली नाही. विराट कोहलीची बॅट जेवढी शांत असेल ते आमच्या संघासाठी फायद्याचं ठरेल असंही स्टोक्स यावेळी म्हणाला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिजमध्ये 1-0 अशी टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. आज दुसरा सामना पुण्यात दुपारी 1.30 वाजता होणार आहे. पहिल्या वन डेमध्ये बेन स्टोक्स 1 रन काढून आऊट झाला होता. इयोन मॉर्गनला दुखापत झाल्यानं तो दुसरा सामना खेळणार नाही. त्यामुळे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी बेन स्टोक्सवर आली आहे. त्याने केलेल्या या व्यक्तव्यामुळे कोहलीच्या चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.