नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दुसरा टी-20 सामना 23 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. तीन टी20 सामन्याच्या मालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपुरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सामन्याच्या दिवशी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर शुक्रवारी होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसाचा धोका आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS) दोन्ही संघ बुधवारी दुपारी नागपुरात दाखल झाले होते. गुरुवारी पहाटे पाऊस पडला आणि जरी सकाळी 10 च्या सुमारास पाऊस थांबला असला तरी, शहरावर दाट ढगांचे आच्छादन होते. म्हणजेच पावसाचा धोका दिवसभर आहे. दरम्यान सकाळच्या पावसामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोघांना दुपार आणि संध्याकाळी त्यांचे नियोजित सराव सत्र रद्द करावे लागले होते.
...तर पैसे परत करावे लागणार
विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी या परिस्थितीबद्दल नाराज आहेत कारण सामन्याच्या दिवशीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 45,000 क्षमतेच्या स्टेडियमवरील सामन्याची तिकिटे आधीच विकली गेली आहेत आणि सामना पुढे न गेल्यास त्यांना खरेदीदारांना पैसे परत करावे लागणार आहेत.
दरम्यान पावसाच्या हवामानावर सामन्याचे भवितव्य असणार आहे. शुक्रवारी जर पाऊस पडला तर सामना कदाचित रद्द करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना देखील मोठा धक्का बसणार आहे.