नवी दिल्ली : टीम इंडिया आता श्रीलंकेसोबत भिडण्यास पुन्हा तयार झाली आहे. याआधी श्रीलंकेत झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाने त्यांना मात दिली होती. आता १६ नोव्हेंबरपासून टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात कोलकातामध्ये पहिली टेस्ट खेळली जाणार आहे. या सीरिजमध्ये अश्विन एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो.
श्रीलंकेसोबतच्या या टेस्टमध्ये सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन याच्यावर असतील. रविंद्र जडेजासोबत अश्विनचीही टेस्ट टीममध्ये वापसी झाली आहे. दोघांना बराचकाळ बाहेर ठेवण्यात आले होते. पण आता टेस्ट सामन्यांमध्ये दोघांच्या खांद्यावर बॉलिंगची जबाबदारी असेल. यात सर्वात जास्त नजरा या अश्विनकडे असेल.
हे टेस्ट सामने अश्विनसाठी खास ठरण्याची शक्यता आहे. तीन टेस्टमध्ये अश्विनने जर ८ विकेट घेतल्या तर तो टेस्टमध्ये जगातला सर्वात वेगवान ३०० विकेट घेणारा खेळाडू ठरणार आहे. श्रीलंके विरूद्ध याआधीच्या सीरिजमध्ये अश्विनने १७ विकेट घेतल्या होत्या. अशात भारतात खेळल्या जात असलेल्या ३ टेस्ट सामन्यांमध्ये अश्विनला ८ विकेट घेणे जास्त कठिण नसणार.
टेस्ट सामन्यांमध्ये आतापर्यंत सर्वात वेगवन ३०० विकेट घेण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज डेनिस लिली याच्या नावावर आहे. त्याने हा कारनामा ५६ टेस्ट सामन्यांमध्ये केला होता. पण अश्विन हा रेकॉर्ड त्यापेक्षा कमी टेस्ट सामन्यांमध्येच आपल्या नावावर करु शकतो. अश्विनने ५२ टेस्ट सामन्यांमध्ये २९२ विकेट घेतल्या आहेत. अश्विनने याआधी श्रीलंके विरूद्ध ६ सामन्यांमध्ये ३८ विकेट्स घेतल्या आहेत. टेस्टमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेचा स्पिनर मुथैया मुरलीधरन याच्या नावावर आहे. मुरलीने १३३ टेस्ट सामन्यांमध्ये ८०० विकेट घेतल्या आहेत.