मुंबई: देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचं संकट क्रिकेट विश्वावरही असताना क्रीडा विश्वातून मोठी बातमी येत आहे. IPLची रंगत वाढत असतानाच टीम इंडियाचं शेड्युल खूप व्यस्त असल्याचं दिसत आहे. 30 मे पर्यंत IPL सामने संपणार आहेत. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 18 ते 22 जून दरम्यान आहे. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप असणार आहे.
टी 20 वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महत्त्वपू्र्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी पाकिस्तानच्या संघाला भारतात टी 20 वर्ल्डकपसाठी येण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 9 शहरांमध्ये टी 20 वर्ल्डकपसाठी सामने होणार आहेत. तर महाअंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान याच्या तारखा असणार आहेत.
BCCI च्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार दिल्ली, मुंबई, हैदराबाद, धर्मशाला (हिमाचल प्रदेश), चेन्नई, बेंगलुरू, लखनऊ आणि कोलकाता इथे सामने होणार आहेत. तर महाअंतिम सामना हा अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आणि त्यावेळची परिस्थिती पाहून अंतिम निर्णय घेण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला भारतात टी 20 वर्ल्डकपसाठी येण्याची परवानगी मिळाली आहे. तर या सामन्यांना प्रेक्षकांना परवानगी असेल की प्रेक्षकांविनाच सामने होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.