जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम भारतात, बांधणी जवळपास पूर्ण

ऑस्ट्रेलियातलं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. 

Updated: Jan 21, 2020, 08:29 PM IST
जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम भारतात, बांधणी जवळपास पूर्ण title=

अहमदाबाद : ऑस्ट्रेलियातलं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. पण लवकरच मेलबर्नला मिळत असलेला हा मान जाणार आहे. अहमदाबादचं सरदार पटेल स्टेडियम हे आता जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम होणार आहे. या स्टेडियमला मोटेरा स्टेडियम म्हणूनही ओळखलं जातं. अहमदाबादच्या या स्टेडियममध्ये जवळपास १ लाख १० हजार प्रेक्षक बसून मॅच बघू शकतात.

सरदार पटेल स्टेडियमचं काम हे जवळपास पूर्ण झालं आहे. याचवर्षी हे स्टेडियम वापरासाठी उपलब्ध होणार आहे. आयसीसीनेही सरदार पटेल स्टेडियमचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये एकावेळी १ लाखाच्या आसपास प्रेक्षक बसू शकतात. सरदार पटेल स्टेडियममध्ये आधी जवळपास ४९ हजार प्रेक्षकांची बसण्याची क्षमता होती. बीसीसीआय या स्टेडियममध्ये भारत आणि जागतिक-११ टीममधली मॅच खेळवण्याच्या विचारात आहे. मार्च महिन्यामध्ये हा सामना होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, पण याबाबत अजून बीसीसीआयने स्पष्ट भूमिका मांडली नाही. दुसरीकडे आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या वेळापत्रकाचीही घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे आयपीएलची फायनलही या स्टेडियममध्ये खेळवली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

सरदार पटेल स्टेडियममध्ये भारताची शेवटची मॅच २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध झाली होती. या मॅचनंतर स्टेडियमच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली.

जानेवारी २०१८ मध्ये या स्टेडियमचं भूमीपूजन झालं होतं. गुजरात क्रिकेट असोसिएशननं लार्सन ऍण्ड टर्बो (एल ऍण्ड टी) या कंपनीला हे स्टेडियम बांधण्याचं कंत्राट दिलं. हे स्टेडियम बांधण्यासाठी शापूरजी पालनजी आणि नागार्जून कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनीही अर्ज केले होते. जगप्रसिद्ध आर्किटेक्चर फर्म एमएस पॉप्युलसनं या स्टेडियमचं डिझाईन केलं आहे. याच फर्मनं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचंही डिझाईन केलं होतं.

हे स्टेडियम उभारण्यासाठी अंदाजे ७०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हे नवं क्रिकेट स्टेडियम ६३ एकर परिसरात पसरलं आहे. या स्टेडियममध्ये ५० रूम असलेलं क्लब हाऊस, ७६ कॉरपोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रूम, क्रिकेटपटूंसाठी ३ प्रॅक्टिस ग्राऊंड, इनडोर क्रिकेट अकादमी, ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, ३ हजार चारचाकी आणि १० हजार दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था असेल.

मोटेरा स्टेडियमचा इतिहास

१९८३ साली मोटेरा स्टेडियम बांधण्यात आलं होतं. १९८३ साली या मैदानात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात आली. १९८७ साली सुनिल गावसकर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन याच मैदानात पूर्ण केल्या. त्यावेळी टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण करणारे गावसकर हे पहिले क्रिकेटपटू बनले. यानंतर ७ वर्षांनी कपिल देव यांनी रिचर्ड हॅडलींचा ४३१ विकेटचा विश्वविक्रम मोडीत काढला. १९९९ साली सचिन तेंडुलकरनं त्याच्या टेस्ट कारकिर्दीतलं पहिलं द्विशतक याच मैदानात केलं होतं.