दुबई : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या वादानंतर अखेर आयसीसीने सुपर ओव्हरचा नियम बदलला आहे. वर्ल्ड कपच्या सेमी फायनल किंवा फायनलमध्ये सुपर ओव्हरही टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जोपर्यंत मॅचचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवल्या जातील, असा निर्णय आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
२०१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झालेली फायनल टाय झाली. यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे जास्त बाऊंड्री मारलेल्या इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. जर २०१९ वर्ल्ड कपमध्ये हा नवा नियम असता तर पुन्हा एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली असती.
'या नव्या नियमामध्ये विरोधी टीमपेक्षा जास्त रन करणारा विजयी होईल, हे तत्व वापरण्यात आलं आहे,' असं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे. याआधी ५० ओव्हर वर्ल्ड आणि २० ओव्हर वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल मॅचमध्येच सुपर ओव्हर खेळवली जायची, पण आता ग्रुप स्टेजच्या मॅचमध्येही सुपर ओव्हर होणार आहे.
ग्रुप स्टेजच्या मॅचमध्ये सुपर ओव्हर होणार असली, तरी या मॅचची सुपर ओव्हर टाय झाली तर मात्र दोन्ही टीमना समान पॉईंट्स दिले जाणार आहेत.