IPL 2020 : मोठा धक्का! दुखापतीमुळं 'या' खेळाडूची स्पर्धेतूनच माघार

भारतीय संघालाही भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.   

Updated: Oct 5, 2020, 07:15 PM IST
IPL 2020 : मोठा धक्का! दुखापतीमुळं 'या' खेळाडूची स्पर्धेतूनच माघार  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या काळात मिळालेल्या पराभवानंतर पुन्हा रुळावर येणाऱ्या हैदराबादच्या संघाला आता एक मोठा झटका मिळाला आहे. संघाच्या गोलंदाजीच्या फळीतील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या भुवनेश्वर कुमार याला आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून माघार घ्यावी लागत आहे. मागील सामन्यागरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे आणि हिप इंज्युरीमुळं तो IPL 2020 मधून बाहेर झाला आहे. 

मागील आठवड्यामध्ये हैदराबाद आणि चेन्नई या दोन संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यामध्ये अखेरचं षटक टाकतेवेळी भुवनेश्वरला दुखापत झाली होती. त्याचवेळी त्यानं मैदानातूनही काढता पाय घेतला होता. ज्यानंतर रविवारी शारजाहच्या मैदानात मुंबईविरोधातील सामन्यात भुवी हैदराबादच्या संघात दिसला नव्हता. 

सूत्रांचा हवाला देत एएनआयनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार यंदाच्या आयपीएल सामन्यांमध्ये त्याला सहभागी होता येणार ऩाही. अर्थात संघासाठी हा मोठा धक्काच आहे. फक्त गोलंदाजांची फळीच नव्हे, तर संघातील इतर खेळाडूंना मार्गदर्शन करण्यातही भुवनेश्वरची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळं त्याची उणीव संघाला भासेल यात शंका नाही. 

 

Image

रविवारच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं भुवनेश्वर पुढील काही सामने खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. पण, आता मात्र तो या स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे. त्यामुळं संघाला त्याच्या तोडीच्या गोलंदाजाची उणीव जाणवेल. टी नटराजन वगळता सध्या खलील अहमद, सिद्धार्थ कौल आणि संदीप शर्मा या खेळाडूंना अद्यापही सूर गवसलेला नाही. त्यामुळं भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत आता गोलंदाजीची मदार राशिद खान आणि टी नटराजन या खेळाडूंवरच असेल. मुख्य म्हणजे भुवनेश्वरनं आयपीएलमधून घेतलेली माघार भविष्यात भारतीय संघासाठीही अडचणीची ठरु शकते. कारण IPL 2020 नंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा आता त्यासाठी नेमकी काय आखणी केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.