6 बॉलमध्ये 6 विकेट्स! ऑस्ट्रेलियन खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी; टीमचा रोमहर्षक विजय

6 Wickets In 6 Balls: काही खेळाडूंनी 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. मात्र तुम्ही कधी 6 बॉलमध्ये 6 विकेटबद्दल ऐकलं आहे का? पण असं खरोखर घडलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 14, 2023, 10:32 AM IST
6 बॉलमध्ये 6 विकेट्स! ऑस्ट्रेलियन खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी; टीमचा रोमहर्षक विजय title=
जिंकण्यासाठी 4 धावा हव्या असतानाच हाती 6 विकेट्स असणारा संघ पराभूत झाला

6 Wickets In 6 Balls: भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगबरोबरच बोटावर मोजता येणाऱ्या काही खेळाडूंनी 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. मात्र तुम्ही कधी 6 बॉलमध्ये 6 विकेटबद्दल ऐकलं आहे का? हे वाचून तुम्ही म्हणाल हे असं शक्यच नाही. कितीही उत्तम गोलंदाज असला तरी एकाच ओव्हरमध्ये अशी डबल हॅटट्रीक अशक्यच असल्याचं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. एका खेळाडू खरोखरच 6 बॉलमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत.

सामना 4 धावांनी जिंकला

ऑस्ट्रेलियातील थर्ड डिव्हिजन क्लब क्रिकेटपटूने हा पराक्रम करुन दाखवला आहे. या कामगिरीमुळे या गोलंदाजाच्या संघाला विजय मिळवता आला आहे. गॅरिथ मॉर्गन असं या गोलंदाजाचं नाव आहे. गॅरिथ हा मुडगिराबा निरँग अॅण्ड डिस्ट्रीक्ट क्लब या संघाचा कर्णधार आहे. गॅरिथने एकाच ओव्हरमध्ये डबल हॅटट्रीक घेतल्याने त्यांच्या संघाला रंकज सामन्यामध्ये 4 धावांनी सर्फर पॅरेडाईज क्रिकेट क्लब या संघावर निसटता विजय मिळवता आला. हे दोन्ही संघ गोल्ड कोस्ट प्रिमिअर लीग डिव्हिजन 3 च्या सामन्यात शनिवारी गॅरिथने हा पराक्रम केला. 

174 वर 4 बादवरुन 174 वर ऑल आऊट

सर्फर पॅरेडाईजचा संघ 178 धावांचा पाठलाग करताना 174 वर 4 बाद अशा सुस्थितीमध्ये होता. 40 ओव्हरचा हा सामना सर्फर पॅरेडाईज सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र गॅरिथने एकट्याने संपूर्ण सामना फिरवला. त्याने 6 बॉलमध्ये 6 फलंदाजांना बाद करत सर्फर पॅरेडाईजचा संपूर्ण संघ 174 धावांवर तंबूत परतला. यापैकी 5 फलंदाज गोल्डन डकवर म्हणजेच पहिल्याच चेंडूत शून्य धावसंख्येवर तंबूत परतले. 

4 कॅच आणि 2 बोल्ड

सर्फर पॅरेडाईजचे जे 6 फलंदाज बाद झाले त्यापैकी पहिले 4 जण झेलबाद झाले. तर शेवटचे 2 फलंदाज बोल्ड झाले, असं एबीसी डॉट नेट डॉट एयूने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. गॅरिथ हा स्थानिक प्रशासनामध्ये काम करतो. सामना संपला तेव्हा गॅरिथच्या गोलंदाजीची आकडेवारी 7 ओव्हरमध्ये 16 धावांवर 7 विकेट्स अशी होती. सामन्याच्या सुरुवातीलाच गॅरिथने सर्फर पॅरेडाईजचा सलामीवीर जॅक गारलॅण्डला बाद केलं होतं. विशेष म्हणजे फक्त गोलंदाजीच नाही तर गॅरिथ हा या सामन्यात त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. त्याने 39 धावा केल्या. 

यापूर्वीचा विक्रम या तिघांच्या नावे

एबीसीने उपलब्ध आकडेवारीनुसार दिलेल्या माहितीप्रमाणे, एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या निल वँगरच्या नावे आहे. त्याने 2011 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 5 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये घेतलेल्या. भारताच्या अभिमन्यू मिथूनने 2019 साली कर्नाटककडून खेळताना हरियाणाच्या संघातील 5 खेळाडूंना एकाच ओव्हरमध्ये बाद केलं होतं. तर 2013 साली बांगलादेशच्या अल-अमिन हुसैनीने यूसीबी-बीसीबी XI च्या संघासाठी अभानी लिमिटेड संघाविरुद्ध ही कामिगिरी केलेली.