मुंबई : भारताचे दिग्गज कॉमेंटेटर हर्षा भोगले यांना आयपीएलमधल्या चेन्नईच्या फॅन्सच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादविरुद्धच्या क्वालिफायरमध्ये चेन्नईचा रोमहर्षक विजय झाला. या विजयामुळे चेन्नईनं आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला होता. चेन्नईच्या या विजयाबद्दलचं ट्विट हर्षा भोगलेंनी केलं होतं. चित्रपटसृष्टीच्या मुख्यालयातून सर्वोत्तम स्क्रिप्ट समोर आल्याचं हर्षा भोगले या ट्विटमध्ये म्हणाले. हर्षा भोगलेंच्या या ट्विटमुळे चेन्नईचे चाहते चांगलेच भडकले आणि भोगले मॅच फिक्सिंगचा संशय व्यक्त करत आहेत का असा सवाल यूजर्सनी विचारला.
From the headquarters of the film industry, come the finest scripts!! #Chennai. #CSK
— Harsha Bhogle (@bhogleharsha) May 22, 2018
यानंतर अखेर हर्षा भोगलेंना त्यांच्या ट्विटवर स्पष्टीकरण द्यावं लागलं. फॅन्सनी शांत व्हावं. कोणीही चांगलं खेळलं तरी आपण ही स्क्रिप्ट कोणी लिहीली असं विचारतो. त्यामुळे असं ट्विट केल्याचं हर्षा भोगले म्हणाले.
Chill guys. When someone plays well we say "wow, what a script he is writing!". When a star plays well consistently we say "who writes his scripts!" And so, read this tweet as "wow, CSK, you are playing these matches better than anyone else". https://t.co/bXrYigzrib
— Harsha Bhogle (@bhogleharsha) May 22, 2018
याआधीही हर्षा भोगलेंच्या कॉमेंट्रीमुळे वाद झाला होता. २०१६ साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपवेळी झालेल्या कॉमेंट्रीवर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आक्षेप घेतले होते. भारतीय कॉमेंटेटर भारतीय टीमचं कौतुक करण्याऐवजी दुसऱ्या देशाच्या खेळाडूंचं कौतुक करतात हा पक्षपातीपणा असल्याचा आरोप बिग बींनी केला होता. अमिताभ यांनी या ट्विटमध्ये हर्षा भोगलेंबद्दल भाष्य केलं नसलं तरी त्यांचा रोख हर्षा भोगलेंकडे असल्याचं बोललं गेलं. महेंद्रसिंग धोनीनंही बिग बींचं हे ट्विट रिट्विट केलं. या ट्विटचा फटका हर्षा भोगलेंना २०१६ सालच्या आयपीएलमध्ये बसला. शेवटच्या क्षणी त्यांना आयपीएलच्या कॉमेंट्री टीममधून डच्चू देण्यात आला.