Surykumar yadav : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवली गेली. राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाने 91 रन्सने श्रीलंकेचा (INDIA win) धुव्वा उडवला आणि सिरीजवर कब्जा केला. या सामन्याचा खरा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला. शतकी खेळी करत त्याने सामन्यासह सिरीजही जिंकवून दिली. अशातच टीमचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) सूर्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार हार्दिक पंड्याने श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर फलंदाज सूर्यकुमारचं कौतुक केलं. यावेळी हार्दिक पंड्या म्हणाला, मला असं वाटतं की, सूर्या त्याच्या प्रत्येक खेळीने प्रत्येकाला आश्चर्यचकित करतो. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, त्या माध्यमातून तो आम्हाला सांगू इच्छितो की, फलंदाजी करणं किती सोपं आहे. जर मी त्याच्या समोर गोलंदाजी करत असतो, तर त्याची फलंदाजी पाहून मी निराश झालो असतो.
कालच्या सामन्यात केवळ 45 चेंडूत सूर्याने आपलं शतक (Suryakumar Yadav 3rd Century) पूर्ण केलं. 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत सूर्याने टी-ट्वेंटीमधील आपलं तिसरं शतक साजरं केलं. यामध्ये त्याने 8 सिक्स आणि 6 फोर खेचले. 219 च्या स्टाईक रेटने सूर्याने उत्तम खेळी केली. सूर्याच्या य़ा खेळीने टीम इंडियाचा हा स्कोर 228 पर्यंत पोहोचला होता.
सूर्यकुमारचं टी20 फॉरमॅटमधले तीसरे टी20 शतक होते. या आधी त्याने जूलै 2022 मध्ये इग्लंडविरूद्ध 117 धावा केल्या होत्या. हे त्याचे टी20तले पहिले शतक होते. तर दुसरे शतक त्याने न्यूझीलंड विरूद्ध नोव्हेंबरमध्ये ठोकले आहेत. यावेळी त्याने 111 धावांची नाबाद खेळी केली होती. आणि आता श्रीलंकेविरूद्ध तिसरे शतक ठोकले होते.