२०१९ निवडणुकीआधी गंभीरचा राजकारण्यांना सल्ला

भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर नेहमीच भारतीय लष्कर आणि सामाजिक मुद्द्यांवर त्याचं रोखठोक मत मांडत असतो.

Updated: Jun 5, 2018, 03:38 PM IST
२०१९ निवडणुकीआधी गंभीरचा राजकारण्यांना सल्ला title=

नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर नेहमीच भारतीय लष्कर आणि सामाजिक मुद्द्यांवर त्याचं रोखठोक मत मांडत असतो. सोशल मीडियवर गंभीर या विषयांवर भाष्य करतो. काश्मीरमध्ये होत असलेल्या दगडफेकीच्या घटनांवर गंभीरनं नाराजी व्यक्त केली आहे. लष्कराच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्या आणि अशा घटनांचं समर्थन करणाऱ्या नेत्यांवर गंभीर भडकला आहे. जम्मू-काश्मीरच्या नौहट्टामध्ये सुरक्षा दलाच्या गाडीवर जमावानं दगडफेक केली. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जवानांना गाडी घेऊन जाण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. सुरक्षा दलाच्या गाडीखाली येऊन एका तरुणाचा मृत्यूही झाला. कैसर भट असं या तरुणाचं नाव होतं. युवकाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर टीकाही झाली.

'चर्चा कसली करताय'

या घटनेनंतर गौतम गंभीरनं लष्कराची बाजू घेतना दगडफेक करणाऱ्यांची कडक शब्दात टीका केली आहे. दगडफेक करणाऱ्या आणि दहशतवाद्यांशी बंद खोलीत चर्चा करणाऱ्या राजकारण्यांनाही गंभीरनं लक्ष्य केलं आहे. मी खूप दु:खी. हैराण आहे कारण भारत अजूनही याचा विचार करतोय की दगडफेक करणाऱ्यांबरोबर बंद दरवाजाआड चर्चा होऊ शकते. या गोष्टी सोडून द्या आणि खरंच काय चाललंय ते बघा. राजकारण्यांनी इच्छाशक्ती दाखवली तर माझे जवान तुम्हाला निकाल देतील, असं ट्विट गंभीरनं केलं.

गंभीरचा राजकारण्यांना सल्ला

यानंतर गौतम गंभीरनं आणखी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये गंभीरनं काश्मीर प्रश्नावर उपाय सांगितला. ज्या राजकारण्यांना २०१९ ची निवडणूक लढायची आहे त्यांनी काश्मीरमध्ये स्वत:च्या परिवारासोबत एक आठवडा सुरक्षेशिवाय घालवावा. यामुळे त्यांना लष्कराची होत असलेली अडचण आणि काश्मीरी असल्याचा खरा अर्थ कळेल, असं गंभीर म्हणाला आहे.

गंभीरची जवानांना मदत

गौतम गंभीर लष्कराच्या मुद्द्यावर फक्त बोलतच नाही तर याआधी त्यानं अनेकवेळा शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला आहे.  गरजू मुलांच्या शिक्षणासाठी गंभीरनं एका संस्थेची स्थापना केली आहे. गौतम गंभीर फाऊंडेशन असं या संस्थेचं नाव आहे. २०१४ साली गंभीरनं या संस्थेची स्थापना केली आहे. शहिद जवानांच्या कुटुंबाला मदत मिळावी म्हणून ही संस्था काम करते.

गौतम गंभीरच्या संस्थेनं नुकतच अभिरुन दास या मुलाची जबाबदारी घेतली आहे. अभिरुन हा आसामच्या कामरूप जिल्ह्यात राहणारा ५ वर्षांचा मुलगा आहे. अभिरुनचे वडील दिवाकर दास आसामच्या पलाशबाडीमध्ये सीआरपीएफचे जवान होते. मागच्या वर्षी ते शहीद झाले. यानंतर गंभीरची संस्था अभिरुनपर्यंत पोहोचली आणि त्याची जबाबदारी स्वीकारली.

मागच्या वर्षी छत्तीसगडच्या सुकमामध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर गंभीरनं शहिद जवानांच्या २५ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या एएसआय अब्दुल राशिदची मुलगी जोहराला गंभीरनं दत्तक घेतलं. या मुलीच्या शिक्षणाचा खर्च गंभीरनं उचलला. जोहरा मी लोरी म्हणून तुला झोपवू शकत नाही, पण तुझी स्वप्न साकार करायला नक्की मदत करेन. तुझ्या शिक्षणाचा खर्च मी करेन, असं भावनिक ट्विट गंभीरनं केलं होतं.