टोक्यो ऑलिम्पिक 2020 (Tokyo 2020) स्पर्धा ही भारतीय महिला हॉकी संघासाठी (indian women's hockey team) खास ठरली होती. मात्र टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo 2020) भारतीय महिला हॉकी संघाला ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आलं होतं. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला 4-3 ने पराभूत करत कांस्यपदकावर आपले नाव कोरलं होतं. यावेळी भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन (Sjoerd Marijne) यांनी महत्त्वाचे योगदान दिलं होतं. मात्र ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यानंतर शोर्ड मरिन यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर आता माजी प्रशिक्षक शोर्ड मरिन हे पुन्हा चर्चेत आले आहेत. भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक शोर्ड मरिन (Sjoerd Marijne) यांनी वरिष्ठ खेळाडू मनप्रीत सिंगवर ( manpreet singh) खळबळजनक आरोप केले आहेत. शोर्ड मरिन यांनी आपल्या पुस्तकात दावा केला आहे की मनप्रीतने एका तरुण हॉकीपटूला त्याच्या क्षमतेपेक्षा कमी खेळण्यास सांगितले होते. मात्र, आता या दाव्याविरोधात न्यायालयात (Court) जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मनप्रीत सिंगने ( manpreet singh) एका तरुण खेळाडूला त्याच्या क्षमतेपेक्षा कमी कामगिरी करण्यास सांगितल्याचा आरोप मरिन यांनी केला आहे. त्यांच्या आगामी पुस्तक 'विल पॉवर - द इनसाईड स्टोरी ऑफ द इनक्रेडिबल टर्नअराउंड इन इंडियन वुमन हॉकी' मध्ये मरिन यांनी लिहिलं आहे की, "वरिष्ठ खेळाडू मनप्रीतने एका खेळाडूला 'चांगले खेळू नको' असे सांगितले जेणेकरून तिचा मित्र संघात सामील होऊ शकेल."
न्यायालयात जाण्याची तयारी
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ आता माजी प्रशिक्षक शोर्ड मरिन आणि प्रकाशक हार्परकॉलिन्स इंडिया यांना न्यायालयात नेण्याच्या तयारीत आहेत. पुरुष आणि महिला संघांनी संयुक्त निवेदन जारी करत म्हटलं आहे की, 'भारताच्या माजी प्रशिक्षकाने मनप्रीत सिंगवर त्यांच्या पुस्तकाची जाहिरात करत आरोप केले. आम्हाला वृत्तपत्रांमधून कळले की संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी आमच्यावर काही त्रासदायक आरोप केले आहेत. प्रशिक्षकांनी आमची वैयक्तिक माहिती ज्याप्रकारे जाहीरपणे उघड केली आणि आमच्यावर लावलेले खोटे आरोप याबद्दल आमची निराशा व्यक्त करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.'
प्रशिक्षणाचा वापर वैयक्तिक व्यावसायिक फायद्यासाठी
निवेदनात पुढे म्हटले आहे की, "माजी प्रशिक्षकाने आमच्यासोबतचा प्रशिक्षणाचा वापर वैयक्तिक व्यावसायिक फायद्यासाठी केला आहे. पुस्तक विकण्यासाठी आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांनी विश्वासाचा आणि कर्तव्याचा पूर्ण भंग केला आहे. आमच्यासारख्या सर्व भारतीय खेळाडूंना अशा परिस्थितीत असुरक्षित वाटत आहे. वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशक मारिन आणि हार्परकॉलिन्स यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आहोत."
कोणतीही तक्रार नाही
भारतीय संघांनी निवेदनात म्हटलं आहे की त्यांना मरिन यांना प्रश्न विचारायचा आहे की जर अशा घटना त्यांच्या कार्यकाळात घडल्या असतील, जो त्यांचा दावा आहे, तर त्या आरोपांची नोंद यावेळी हॉकी इंडिया किंवा भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे असावी. पण आम्ही या संदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, अशी कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसल्याचे समोर आलं.'
खेळाडूंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित
असे खोटे आणि बनावट आरोप करून मरिन यांनी खेळाडूंच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे, असे संघाने म्हटले आहे. निवेदनानुसार, "भारतीय राष्ट्रीय पुरुष आणि महिला हॉकी संघ एकमेकांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करतील, ज्यावर मरिन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमचा देश, संघ आणि हॉकी या खेळाला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या संघातील कोणत्याही सदस्याच्या प्रतिष्ठेला इतर कोणाच्याही वैयक्तिक फायद्यासाठी तडजोड होऊ देणार नाही."
गोल्ड कोस्ट मधील 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत निराशाजनक कामगिरीनंतर वगळण्यापूर्वी मारिन यांनी नऊ महिने भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षण दिले होते. त्यांनी नंतर महिला संघाची जबाबदारी स्वीकारली होते.