मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयन चॅपल हे कॅन्सरशी झुंज देत आहेत. या गोष्टीचा खुलासा स्वत: इयन चॅपल यांनीच केला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इयन चॅपल यांना आपण अनेकदा कॉमेंटरी करताना देखील पाहीले आहे.
एका वेबसाईटसोबत बोलताना चॅपल यांनी सांगितलं की, 'मला त्वचेचा कॅन्सर आहे. यावर गेल्या पाच वर्षांपासून उपचार सुरु आहेत. मी सुरुवातीला कॅन्सर बद्दल जास्त कोणाला सांगितलं नाही. या कॅन्सरसाठी रेडिओथेरेपीची गरज असेल की नसेल? तसेच यासाठी किती दिवसांचा अवधी लागेल?, याबद्दल शाश्वती नसल्याने मी कोणाला सांगितले नाही'.
मी जितकं गंभीर समजतं होतो, तेवढं उपचार भयंकर नव्हते. कॅन्सरमुळे साधारण थकवा आणि त्वचेला खाज यायची. याव्यतिरिक्त सर्व काही ठीक असल्याचं चॅपल म्हणाले. दरम्यान पॅथोलॉजीचा रिपोर्ट देखील दिलासादायक आला आहे. इयन चॅपेल हे ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणाऱ्या एशेस सीरिजसमध्ये आपल्याला कॉमेंट्री करताना दिसतील.
'वयाची ७० वर्ष पूर्ण झाल्यावर साहजिकपणे अशक्तपणा जाणवतो. गेल्या काही वर्षांपासून या अशक्तपणाची सवय झाली आहे', असे देखील चॅपेल म्हणाले.
इयन चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियासाठी ७५ कसोटी सामने खेळले आहेत. चॅपल यांनी १९६४ ते १९८० म्हणजेच १६ वर्ष क्रिकेट खेळलं. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ते समालोचकाची भूमिका देखील करत आहेत. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल हे त्यांचे बंधू आहेत.