FIFA World Cup 2022 : मेस्सीनं चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; अर्जेंटिना अंतिम सामन्यात जाताच हे काय ऐकायला मिळतंय?

FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर आणि जागतिक स्तरावर लोकप्रियता असणारा खेळाडू लिओनेल मेस्सी यानं कमाल खेळाचं प्रदर्शन करत संधाला फिफाच्या अंतिम सामन्यात पोहोचवण्यासाठी मदत केली. 

Updated: Dec 14, 2022, 12:00 PM IST
FIFA World Cup 2022 : मेस्सीनं चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; अर्जेंटिना अंतिम सामन्यात जाताच हे काय ऐकायला मिळतंय?  title=
FIFA World Cup 2022 argentina skipper lionel messi confirms retirment amid fifa final celebrations

FIFA World Cup 2022 :  अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलटू लिओनेल मेस्सी (Lionel messi) याचा सुंदर गोल आणि त्यानं निर्णायक गोलसाठी केलेली मदत या अप्रतिम खेळाच्या बळावर हा संघ फिफाच्या अंतिम (Fifa Final match) सामन्यात पोहोचला. जगज्जेता होण्याचं स्वप्न साकारण्यापासून मेस्सी आता अवघं एक पाऊल दूर असतानाच त्याच्या चाहत्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. ज्यामुळं अंतिम सामन्याचा दिवसच कधी उगवू नये असं अनेकांना वाटत आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे. (FIFA World Cup 2022 argentina skipper lionel messi confirms retirment)

हेसुद्धा पाहा : FIFA World Cup 2022 : मैदानात मेस्सी आणि मैदानाबाहेर त्याच्या पत्नीचीच चर्चा; पहिली प्रतिक्रिया पाहून म्हणाल So Cute...

मेस्सीच्या कारकिर्दीचा शेवट? 

18 डिसेंबरला फिफाचा अंतिम सामना हा मेस्सीचा त्याच्या देशासाठी खेळला जाणारा अंतिम सामना ठरणार आहे. खुद्द या विश्वविख्यात खेळाडूनंच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उपांत्य सामन्यात क्रोएशियाच्या संघाला नमवल्यानंतर मेस्सीनं अर्जेंटिनाच्या माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रविवारी खेळला जाणारा सामना त्याचा सहभाग असणारा देशाच्या संघाकडून खेळला जाणारा शेवटचा सामना असणार आहे. या वृत्तामुळं अनेक फुटबॉलप्रेमी आणि मेस्सीच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं. 

आपल्या कारकिर्दीतील अतिशय महतत्वाच्या वळणावर आलेला मेस्सी याबाबत म्हणाला, 'मला या टप्प्यावर पोहोचण्याचा फारच आनंद होत आहे. या वळणावर माझा वर्ल्ड कपमधील प्रवास थांबवत अंतिम सामन्यात खेळणार असल्याचा मला आनंद आहे. पुढच्या वर्ल्ड कपसाठी बरीच वर्षे आहेत आणि मला वाटत नाही की माझ्यासाठी ते (खेळणं) शक्य आहे. त्यामुळं असा शेवट करणं कधीही उत्तम.'

यंदाचा वर्ल्ड कप मेस्सीनं गाजवला 

फिफा 2022 वर्ल्ड कपमध्ये मेस्सीनं सुरुवातीपासूनच आपल्या खेळाच्या बळावर फुटबॉलप्रेमींना वेड लावलं. त्याचं मैदानात असणंच अनेकांसाठी खूप महत्त्वाचं ठरलं. FIFA 2022 मध्ये त्याला टार वेळा प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. फुटबॉल विश्वचषकात अंतिम सामन्यात खेळण्याची ही मेस्सीची दुसरी वेळ, यापूर्वी 2014 मध्येही त्यानं संघाचं नेतृत्त्वं केलं होतं. तेव्हापासून त्याचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न अपूर्णच आहे. आता तो यावेळी हे स्वप्न पूर्ण करत आपल्या या कारकिर्दीचा अविस्मरणीय शेवट करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.