किंगस्टन : टी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेल व्यतिरिक्त असा आणखी एक फलंदाज आहे ज्याच्या नावाने भारताचे गोलंदाज आता घाबरु लागलेत. ज्याचं नाव आहे एव्हिन लुईस. लुईसचे धावांचे वादळ काल सबिना पार्क मैदानावर पाहायला मिळाले. या वादळाचा भारतीय संघाला जोरदार तडाखा बसला.
भारताविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात लुईसने १२५ धावा तडकावल्या. या सामन्यात भारताला ९ विकेट्ने पराभवास सामोरे जावे लागले.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १९० धावांचा डोंगर उभा केला. यात दिनेश कार्तिकने ४८ आणि कर्णधार कोहलीने ३९ धावा केल्या. यानंतर १९१ धावांचे आव्हान घेऊन विंडीज टीम मैदानात उतरली.
या सामन्यात लुईसने ६२ चेंडूत १२५ धावांची चमकदार खेळी केली. यात त्याने तब्बल डझनभर षटकार लगावले. यासोबतच टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर नोंदला गेलाय. त्याचे हे तिसरे शतक होते. मात्र एकाच देशाविरुद्ध खेळताना दोन शतके झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरलाय. याआधी त्याने भारताविरुद्ध अमेरिकेत खेळताना शतक झळकावले होते.