Tennis Ball कसा बनवतात माहितीये का? बॉलवर पांढऱ्या लाईन का असतात? पाहा Video

How Tennis Ball Is Made Watch Video: आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर टेनिस बॉलने क्रिकेट खेळलं असणार. मात्र हा टेनिस बॉल कसा तयार करतात तुम्हाला ठाऊक आहे का?

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 10, 2023, 04:30 PM IST
Tennis Ball कसा बनवतात माहितीये का? बॉलवर पांढऱ्या लाईन का असतात? पाहा Video title=
या व्हिडीओला 80 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत

How Tennis Ball Is Made Watch Video: भारतीयांना टेनिस हे क्रिकेट इतकं परिचयाचं नसलं तरी टेनिस बॉल जवळपास प्रत्येक भारतीयाला ठाऊक आहे. कारण क्रिकेटवेड्या भारतामध्ये टेनिस बॉल क्रिकेट इतकं लोकप्रिय आहे की टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धाही भरवल्या जातात आणि या स्पर्धांमध्ये लाखो रुपयांच्या बक्षीसांची लयलूटही केली जाते. आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर टेनिस बॉलने क्रिकेट खेळलं असेल. त्यामुळेच टेनिस बॉल हा प्रत्येक भारतीयाला ठाऊक असेच. मात्र हा टेनिस बॉल नेमका बनवतात कसा तुम्हाला ठाऊक आहे का? 

विश्वास बसणार नाही

खरं सांगायचं झालं तर, टेनिस बॉल तयार करण्यासाठी फार मेहनत लागते. टेनिस बॉल कसा बनवला जातो याचा एक व्हिडीओ सध्या एक्स (पूर्वीचं ट्वीटर) या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. 'द फिजेन' (@TheFigen_) नावाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन कायमच असे थक्क करणारे व्हिडीओ पोस्ट केले जातात. याच अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्यामध्ये टेनिस बॉलच्या कारखान्यामध्ये बॉल बनवण्याचं काम कसं होतं हे दाखवण्यात आलं आहे. आजकाल अनेक गोष्टी या मशीनच्या मदतीनेच तयार केल्या जातात त्याचप्रकारे हा बॉलही मशीनच्या मदतीनेच बनवला जातो. मात्र टेनिस बॉल बनवण्याची सुरुवात ज्या पद्धतीने होते त्याची सुरुवात पाहून या गोष्टीपासून टेनिस बॉल तयार होणार आहे यावर विश्वास बसत नाही.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

'टेनिस बॉल कसा बनवला जातो... हे फार कौशल्यपूर्ण कामगार आहेत,' अशा कॅप्शनसहीत हा टेनिस बॉल बनवण्याच्या कारखान्यातील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातील रबरचा मशीनच्या मदतीने स्वच्छ धुतला जातो. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये रबर कट केला जातो. त्यानंतर हा रबर तुकडे तुकडे करुन, वजन करुन हॉटेलमध्ये इडली पात्र असतं त्याप्रमाणे एका गोलाकार साच्यामध्ये एक अशा पद्धतीने टाकला जातो. अनेक गोलाकार साच्यांचा समावेश असलेला हा मोठा चौकोनी साचा कम्प्रेस केला जातो म्हणजेच त्याच्यावर दबाव टाकला जातो. त्यामुळे रबरला अर्धगोलाकार आकार येतो. त्यानंतर हा साचा उघडतात आणि त्यामधून एक एक करुन गोलाकाराचे रबर बाहेर काढले जातात. हे सर्व तुकडे वेगवगेळे केले जातात आणि मग दोन तुकडे एकमेकांशी जोडले जातात. यानंतर या रबराच्या गोळ्यावर म्हणजेच आवरण नसलेल्या बॉलवर टेनिस बॉलला लूक देणारं वेलवेटसारखं हिरव्या किंवा पोपटी रंगाचं आवरण लावलं जातं. यानंतर या बॉलवर पांढऱ्या रेषा काढल्या जातात. अनेक टेनिससंदर्भातील वेबसाईटवरील माहितीनुसार, टेनिस बॉलवरील या पांढऱ्या रंगाच्या लाईन्स 2 रबरी अर्धगोल ज्या ठिकाणी जोडले आहेत तो भाग लपवण्यासाठी काढल्या जातात. मात्र या व्हायरल व्हिडीओमध्ये या लाईन्स केवळ डिझाइनचा भाग असल्याचं वाटतं.

मेहनतीचं कौतुक

या व्हिडीओला 80 लाखांच्या आसपास व्ह्यूज आहेत. अनेकांनी टेनिस बॉल बनवण्यासाठी एवढी मेहनत लागते हे ठाऊक नव्हतं अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. एकाने आपण केवळ शेवटचा प्रोडक्ट पाहतो त्यामागील मेहनतीचंही कौतुक केलं पाहिजे हे या व्हिडीओवरुन समजतं, असं म्हटलं आहे.