मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL 2020)चं वेळापत्रक समोर आलं आहे. अधिकृतपणे त्याची घोषणा झाली नसली तरी देखील यात काही मोठे बदल होणार नाही. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) एक मार्चला टीमशी जोडला जाणार आहे.
धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप सेमीफायनल नंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. सध्या तो कुटुंबासोबत वेळ घालवतो आहे. धोनीने झारखंड टीमसोबत रणजी ट्रॉफीच्या स्क्वाडसोबत सराव केला. पण तो मैदानात खेळताना दिसला नाही. धोनीचे फॅन्स त्याला मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये ही तो खेळला नाही. पण आता धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.
चेन्नई आणि मुंबई यांच्यात पहिला सामना मुंबईत २९ मार्चला होणार आहे. त्याआधी धोनी त्याच्या संघाची एक महिना आधीच सराव करण्यासाठी येणार आहे. टीममधील नवीन खेळाडूंसोबत तो नक्की वेळ घालवेल.
धोनी एक मार्चला सुरेश रैना आणि अंबाती रायडू सोबत सराव करेल. जे तेथे आधी पासूनच सराव करत आहेत. संपूर्ण खेळाडू १० मार्चपासून अधिकृतपणे सरावाला सुरुवात करणार आहेत.