नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबरला लग्न केलं. इटलीच्या बोर्गो फिनोचीतो रिसॉर्टमध्ये लग्न झालं. इटलीतलं हे रिसॉर्ट जगातल्या सगळ्यात महाग रिसॉर्टपैकी एक आहे.
अनुष्काची इच्छा पूर्ण करण्यासाठी विराटनं इटलीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. वाईनयार्डमध्ये लग्न करण्याची इच्छा अनुष्का शर्मानं तीन वर्षांपूर्वी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती. बोर्गो फिनोचीतो रिसॉर्ट हे एक वाईनयार्ड आहे. या रिसॉर्टमध्ये द्राक्षांची शेतीही केली जाते. हे रिसॉर्ट फ्लोरेन्सपासून १०० किलोमिटर लांब आहे.
विराट-अनुष्काचं लग्न स्वप्नवत बनवण्यासाठी देविका नारायणनं सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मुळची लखनऊची असणारी देविका हाय प्रोफाईल लग्नांचं प्लानिंग करते.
विराट-अनुष्काच्या लग्नाचं प्लानिंग करण्यामध्ये देविकाला तिचा पती जोजेफ रादिकनंही मदत केली. देविकाचा पती जोसेफलाच विराट-अनुष्काच्या लग्नाची कनसेप्ट सुचली. तसंच विराट-अनुष्काच्या लग्नाचे फोटोही जोजेफ यांनीच काढले आहेत.
देविकानं लखनऊच्या लॉरेटो कॉनव्हेंट आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं. देविकानं याआधी दिनेश कार्तिक आणि रॉबिन उथप्पाच्या लग्नाचंही प्लानिंग केलं होतं.
चार वर्षांपूर्वी ५ लाख रुपयांच्या भांडवलासह देविकानं या व्यवसायाला सुरुवात केली होती. २०१०मध्ये देविकानं वेडिंग डिझाईनच्या कोर्सला सुरुवात केली. जवळपास ४ वर्ष काम केल्यानंतर २०१४मध्ये देविकानं स्वत:ची कंपनी सुरु केली.
विराट आणि अनुष्काच्या लग्नाबद्दल देविकानं आम्हाला काहीही सांगितलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया देविकाच्या वडिलांनी दिली आहे. विराट-अनुष्काच्या लग्नाच्या अर्धा तास आधीच आम्हाला मुलगी आणि जावयानं लग्नाचं प्लानिंग केल्याचं समजलं, असं देविकाचे वडिल म्हणाले.