मुंबई : मला धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप दिग्गज क्रिकेटपटूने केला. हा आरोप पाकिस्तानच्या खेळाडूवर करण्यात आला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि घातक ऑलराउंडर शाहिद अफ्रिदीवर हा गंभीर आरोप लावण्यात आला आहे.
शाहिद अफ्रिदी आपल्या कामगिरीसाठी जगात प्रसिद्ध आहे. मात्र तो या गंभीर आरोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा गंभीर आरोप कोणी केला आणि अफ्रिदीने नेमकं काय केलं नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया.
शाहिद अफ्रिदीवर त्याच्याच टीममधील माजी दिग्गज स्पिनर बॉलर दानिश कनेरियाने गंभीर आरोप केला. कनेरियाच्या म्हणण्यानुसार, तो हिंदू असल्याने अफ्रिदीने पाकिस्तानी क्रिकेट टीममध्ये नेहमीच त्याला वाईट वागणूक दिली.
अफ्रिदीने त्याला अनेकवेळा धर्म बदलण्याची जबरदस्ती केली. झी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत कनेरिया म्हणाला, 'मी नेहमीच अफ्रिदीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. तो अनेकदा मला धर्म बदलायला सांगायचा, पण मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो.
'अफ्रिदीसोडून इतर खेळाडू माझ्याशी कधीच वाईट वागले नाहीत. कर्णधाराकडे टीमचं पूर्ण नियंत्रण असतं. मात्र त्याने मला नेहमी बेंचवरच बसवलं किंवा मला टीममधून वगळलं. एवढच नाही तर एक पूर्ण हंगाम मला बाहेर बसवण्यात आलं.'
'मी चांगली कामगिरी करूनही माझ्यासोबत असं का होतं याचं उत्तर मला मिळत नव्हतं. मला जेव्हा ए कॅटेगरीचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळालं तेव्हा त्याने मला खूप वाईट शब्दात सुनावलं होतं. त्यामुळे माझी मानसिक स्थिती चांगली नव्हती. '
2013 मध्ये दानिश कनेरियाला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली क्रिकेटमधून बॅन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याच्यावर अन्याय झाल्याचंही त्याने सांगितलं आहे.