मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 21 व्या कॉमनवेल्थ खेळामध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारची सुरुवात दोन पदकांनी झालीय. एकाच वेळी भारताने दोन पदकांची कमाई केलीय.
बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्याचे जेतेपद पटकावत सायना नेहवालने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय. अंतिम सामन्यात फुलराणी सायनानं भारताच्याच पी.व्ही. सिंधूचा पराभव केलाय. सा-या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सामन्यात सायनाने सिंधूचा 21-18, 23-21 असा पराभव केला. या विजयामुळे सायनाने सुवर्णपदक तर सिंधूने रौप्यपदक पटकावलंय. करियरमध्ये दुस-यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची किमया सायना नेहवालने साधली आहे.
#SAINANEHWAL WIN IN WOMEN'S SINGLE BADMINTON#GC2018 #CommonwealthGames2018 pic.twitter.com/wx73ur3h8A
— Doordarshan Sports (@ddsportschannel) April 15, 2018
सायना नेहवालच्या दमदार कामगिरीमुळे भारताला 26 वे सुवर्णपदक मिळाले आहे. वर्ल्ड नंबर 12 सायना नेहवालने यापूर्वी 2010 साली दिल्लीमध्ये आयोजित कॉमनवेल्थ खेळामध्ये सुवर्णपदक पटकावले होते. कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदकं पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला बॅटमिंटनपटू ठरली आहे.