नवी दिल्ली : २१ व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रविवारी चौथ्या दिवशी भारताची महिला बॉक्सर मेरीकॉमने शानदार प्रदर्शन केलं. ५ वेळा वर्ल्ड चॅम्पियन मेरीकॉमने महिलांच्या 45-48 किलोग्रॅम वजनी गटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मेरीकॉमने या स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये स्कॉटलँडच्या मेगन गोर्डनचा 5-0 ने पराभव केला. मेरीकॉमसमोर 18 वर्षीय मेगन काही खास कामगिरी करु शकली नाही. मेरीकॉमचा सामना आता सेमीफायनलमध्ये श्रीलंकेच्या अनुषा दिलरुक्शी सोबत होणार आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये चौथ्य़ा दिवशी भारतीय महिला खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने गोल्ड पदक मिळवलं आहे. नेमबाजीमध्ये देशाला २ मेडल मिळाले आहेत. नेमबाज मनु भाकरने गोल्ड तर हिना सिद्धुने सिल्वर मेडल मिळवलं. मनु भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल गटात भारताच्या खात्यात आणखी एक मेडल जमा केलं. हिना सिद्धुने देखील सिल्वर मेडलची कमाई केली. मनुने भारतासाठी सहावं गोल्ड मेडल जिंकलं.