उत्तराखंडमधील आपत्तीनंतर क्रिकेटर ऋषभ पंतने जाहीर केली मदत

बांध फुटल्यामुळे 150 हून अधिक लोकं बेपत्ता 

Updated: Feb 8, 2021, 11:11 AM IST
उत्तराखंडमधील आपत्तीनंतर क्रिकेटर ऋषभ पंतने जाहीर केली मदत title=

मुंबई : उत्तराखंडमधील चामोलीमध्ये पुन्हा एकदा विनाश दिसू लागला आहे. बांध फुटल्यामुळे 150 हून अधिक लोकं बेपत्ता झाले आहेत. अनेकांचे मृतदेह हाती लागले आहेत. लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. या आपत्तीनंतर भारताचा विकेटकीपर ऋषभ पंत यांनी मदतीची घोषणा केली आहे. त्यांनी आपली मॅच फी मदत म्हणून देण्याचं जाहीर केलं आहे. चेन्नई येथे सध्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणार्‍या पंतने या आपत्तीत आपला जीव गमावलेल्या लोकांबद्दल दुःख व्यक्त केले.

ऋषभ पंतने ट्वीट केले की, "उत्तराखंडमध्ये ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्यासाठी तीव्र शोक व्यक्त करतो. बचाव करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना मी मॅच फी मदत म्हणून देत आहे. अधिकाधिक लोकांनी मदत करा.' 

पहिल्या टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी पंतचं शतक थोड्यासाठी हुकलं, त्याने ९१ रनची जलद खेळी केली. पाचव्या विकेटसाठी त्याने चेतेश्वर पुजारा (73) सोबत 119 रनची पार्टनरशिप केली.

आणखी एका ट्विटमध्ये त्याने म्हटले की, "उत्तराखंडमधील पूरग्रस्त पीडित कुटुंबियांसाठी मी मनापासून प्रार्थना करतो. बचाव कार्य चालू आहे. आशा आहे की जे संकटात आहेत त्यांना मदत केली जाईल." भारतीय क्रिकेटपटूंना कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये सामना शुल्क मिळते. अशा परिस्थितीत ऋषभ पंतने 15 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफकडून सातत्याने बचावकार्य राबवले जात आहे. बचाव पथकाने 15 लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

रविवारी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन-रेणी भागात बांध फुटला. त्यामुळे धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि घरं आणि वीज प्रकल्पांचं मोठं नुकसान झालं. आयटीबीपीचे महासंचालक एस.एस. देसवाल म्हणाले, "सुमारे 100 कामगार घटनास्थळी असल्याचा संशय आहे. त्यापैकी 9-10 मृतदेह नदीतून सापडले आहेत." जवळपास 170 लोकं बेपत्ता आहेत.

बातमी: सिराजने धरली कुलदीपची कॉलर, २ बॉलर्समधील वादाचा व्हिडिओ व्हायरल