मुंबई : टीम इंडियाने श्रीलंके विरूद्ध खेळलेल्या तीन टेस्ट सीरिजने ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. हा टीम इंडियाचा लागोपाठ नववा विजय आहे. यासोबतच श्रीलंके विरूद्ध वनडे आणि टी-२० सामन्यांसाठी विश्रांती घेतल्याने विराटचं हे वर्ष संपलं आहे.
२०१७ मध्ये फलंदाजीमधेय कोहलीला रन्सच्या डोंगरासाठी ओळखले जाईल. जर यावर्षात त्याने ५० रन्स आणखी केले असते तर त्याने कुमार संगकाराचा कॅलेंडर ईअरमध्ये सर्वात जास्त रन्स केल्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. चला नजर मारूयात विराटच्या यावर्षीच्या रेकॉर्डकडे....
विराट कोहली हा पहिला असा भारतीय कर्णधार आहे ज्याने तीन वेगवेगळ्या टेस्ट सीरिजमध्ये ६०० पेक्षा जास्त रन्स केलेत कोहलीने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध ६९२, २०१६-१७ मध्ये इंग्लंड विरूद्ध ६५५ आणि २०१७-१८ मध्ये श्रीलंका विरूद्ध ६१० रन्स केलेत. राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर ने दोनदा हा कारनामा केला होता.
विराट कोहली टेस्ट सीरिजमध्ये ६०० पेक्षा अधिक रन्स करणारा जगातला दुसरा आणि भारताचा पहिला खेळाडू बनला आहे. सर डोनाल्ड ब्रॅडमनने ६ वेळा ६०० पेक्षा जास्त रन्स केले. तर नील हार्वे, गॅरी सोबर्स, ब्रायन लारा आणि विराट कोहलीने तीन-तीन वेळा ६०० पेक्षा जास्त रन्स केले आहेत. फिरोजशाह कोटला मैदानावर श्रीलंके विरूद्धच्या तिस-या टेस्टच्या चौथ्या दिवशी आपल्या ५० रन्सच्या खेळी दरम्यान तीन सीरिजमध्ये ६०० पेक्षा जास्त रन्स करण्याचा रेकॉर्ड विराटने आपल्या नावावर केला.
टेस्ट सीरिजमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक खेळी करू जास्त रन्स करणारे केवळ दोनच खेळाडू आहेत. डॉन ब्रॅडमनने दक्षिण आफ्रिके विरूद्ध १९३१-३२ मध्ये पाच टेस्ट सामन्यांमध्ये ८०६ आणि मोहम्मद युसूफने २००६-०७ मध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध ३ टेस्ट सामन्यांमध्ये ६६५ रन्स केले होते.
विराट कोहली एका कॅलेंडर ईअरमध्ये सर्वात जास्त रन्स करणा-यांच्या यादीत तिस-या स्थानावर पोहोचला आहे. कुमार संगकारा ने २८६८(२०१४), रिकी पॉंटींग २८३३(२००५), विराट कोहली २८१८ (२०१७), केन विलियम्सन २६९२ (२०१५), अॅंजेलो मॅथ्यूज २६८७ (२०१४), रिकी पॉंटीम्ग २६५७ (२००३), राहुल द्रविड २६२६ (१९९९), कुमार संगकारा २६०९ (२००६), विराट कोहली २५९५ (२०१६) आणि सौरव गांगुली २५८० (१९९९) रन्स केले आहेत.
कर्णधार विराट कोहली एखाद्या टेस्ट सीरिजमध्ये शून्यावर सुरूवात करूनही तिसरा सर्वात जास्त रन्स करणारा खेळाडू आहे. जॅक कॅलिसने २००४-०५ इंग्लंड विरूद्ध (१० खेळी) ६२५, मायकल वॉनने २००२ मध्ये टीम इंडिया विरुद्ध (७ खेळी) ६१५ आणि विराट कोहलीने २०१७-१८ मध्ये श्रीलंका विरूद्ध (५ खेळी) ६१०) रन्स केलेत.
कोहलीने कोलकाता टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट होऊन दुस-या इनिंगमध्ये १०४ रन्सची नाबाद खेळी केली. त्यानंतर कोहलीने नागपूर टेस्टमध्ये २१३ रन्स केले. दिल्ली टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये २४३ रन्सची दमदार खेळी केली आणि लागोपाठ तीन दुहेरी शतक लगावणारा पहिला कर्णधार बनला. श्रीलंके विरुद्ध तिस-या टेस्ट सामन्याच्या दुस-या दिवशी विराट कोहलीने आपलं सहावं दुहेरी शतक झळकावलं. त्याने सकाळी १५६ रन्सपासून खेळण्याला सुरूवात केली आणि दुहेरी शतकापर्यंत पोहचण्यात त्याला काहीच अडचण गेली नाही. कर्णधार म्हणूनही हे त्याच्या करिअरचं सहावं दुहेरी शतक होतं. हा कारनामा करणारा तो जगातला एकुलता एक खेळाडू आहे.
विराट या दुहेरी शतकासोबतच टीम इंडियाकडून सर्वात जास्त दुहेरी शतकं लगावणा-या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या बरोबरीत पोहोचला आहे. सचिन आणि सेहवागने टेस्ट क्रिकेटमध्ये सहा दुहेरी शतकं केले आहेत.