U19 वर्ल्डकपच्या सेमीफायनल पाकिस्तानचा पराभव, भारत-ऑस्ट्रेलिया फायनल

AUS vs PAK, Semi Final: अंडर-19 वर्ल्ड कपमधल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारलीय. फायनलमध्ये आता भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने असणार आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 8, 2024, 10:18 PM IST
U19 वर्ल्डकपच्या सेमीफायनल पाकिस्तानचा पराभव, भारत-ऑस्ट्रेलिया फायनल title=

Under-19 World Cup 2024 Final, IND vs AUS : अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेतला सेमीफायनलचा (U19 Sefinal) दुसरा सामना जबरदस्त चुरशीचा झाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर (Australia beat Pakistan) एक विकेटने विजय मिळवला. आता अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया (India-Australia Final) आमने सामने असणार आहे. 11 फेब्रुवारीला स्पर्धेची फायनल रंगणार आहे. सेमीफायलनच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पहिली फलंदाजी दिली. पाकिस्तानने 9 विकेट गमावत 179 धावा केल्या. पण विजयाचं सोप वाटणार आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाचाही घाम निघाला. 

विजयी आव्हान पार करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. पन्नासव्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार लगावत ऑस्ट्रेलियाने थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाच्या रफ मॅकमिलनने विजयी चौकार लगावला. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि भारत आमने सामने असणार आहेत. भारताने सेमीफायनलमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. 

पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली
पहिली फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवातच खराब झाली. अवघ्या 79 धावांवर पाकिस्तानने पाच विकेट गमावले. त्यानंतर अजान अवैस  (52) आणि अराफात मिन्हास (52) अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानला 150 धावांचा टप्पा पार करुन दिला. पाकिस्तानने 48.5 षटकात 179 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या टॉम स्ट्रेकरने 9.5 षटकात 24 धावा देत सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. 

ऑस्ट्रेलियाचा चुरशीचा विजय
विजयाचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचीही चांगलीच दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने  164 धावांवर 9 विकेट गमावले. 24 चेंडूत त्यांना विजयासाठी 16 धावांची गरज होती. पाकिस्तान हा सामना सहज जिंकणार असं वाटत असतानाच ऑस्ट्रेलियाच्या राफ मॅकमिलनने नाबाद 19 धावा करत पाकिस्तानच्या हातातून विजय अक्षरश: हिसकावून घेतला. मॅकमिलनला शेवटचा फलंदाज कॅलम विडलरने चांगली साथ दिली. तो 2 धावा करुन नाबाद राहिला. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावत 181 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे हॅरी डिक्सनने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर ओलिवीर पीकने 49 धावा केल्या. 

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अली रजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर फिरकी गोलंदाज अराफत मिनहासने 2 विकेट घेतल्या. 

भारत-ऑस्ट्रेलिया फायनल

येत्या अकरा तारखला म्हणजे रविवारी अंडर-19 विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना रंगणार आहे. 2023 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. आता ज्युनिअर भारतीय संघ या पराभवाचा बदला घेणार का याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.