लंडन: २०१५ सालच्या अॅशेस मालिकेदरम्यान एका ऑस्ट्रेलियन खेळाडुने आपल्याविरोधात धर्मद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली याने केला आहे. २०१५ सालची अॅशेस मालिका ही माझ्यादृष्टीने अत्यंत महत्वाची होती. इतर खेळाडूंप्रमाणे माझी कामगिरीही या मालिकेत उल्लेखनीय झाली होती. मात्र, यावेळी एका प्रसंगामुळे माझे लक्ष विचलित झाले होते. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू वळाला आणि 'टेक दॅट ओसामा' असे मला म्हणाला. जे ऐकले त्यावर माझा विश्वासच बसला नाही. मी त्याच्यावर प्रचंड चिडलो होतो. या प्रसंगामुळे मी खूप अस्वस्थ झाल्याचे मोईन अलीने म्हटले.
३१ वर्षीय मोईन अली आपलं आत्मचरित्र प्रकाशित करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर 'द टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या आठवणी सांगितल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ वाईट आहे, हे तुम्हाला कुणीही सांगेल, अशा शब्दांत मोईन अलीने आपला राग व्यक्त केला.