Corona : उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयाला अजिंक्य रहाणेचा पाठिंबा

देशभरामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

Updated: Apr 13, 2020, 08:25 PM IST
Corona : उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयाला अजिंक्य रहाणेचा पाठिंबा title=

मुंबई : देशभरामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्याही देशात सर्वाधिक आहे. राज्यातली ही परिस्थिती बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

'कोरोना व्हायरसशी आपल्याला लढायचं आहे. कोरोनाचा प्रसार आपल्याला रोखायचा आहे. महाराष्ट्रातला लॉकडाऊन वाढवण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा द्या. आपली एकी या व्हायरसला हरवण्यासाठी मदत करेल,' असं ट्विट अजिंक्य रहाणेने केलं आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी अजिंक्य रहाणेने याआधीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाख रुपयांची मदत केली आहे. 

ओडिसा आणि पंजाबनंतर महाराष्ट्रानेही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उद्या सकाळी १० वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधानदेखील देशातला लॉकडाऊन आणखी वाढवण्यात येणार असल्याची घोषणा करू शकतात. ११ तारखेला पंतप्रधान आणि सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत बहुतेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली.