मुंबई : विराट कोहलीने कसोटी टीमचं कर्णधारपद सोडलं असून त्याच्या या निर्णयाचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच विराट कोहलीने ही घोषणा केली. कोहलीच्या या निर्णयानंतर अनेक खेळाडूंनी विराटसोबतचे त्यांचे अनुभव शेअर केलेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद आमीरनेही विराटबद्दल एक खास ट्विट केलंय.
मोहम्मद आमिर त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, "भावा विराट कोहली, माझ्यासाठी तुम्ही नव्या पिढीचा खरा लीडर आहेस. कारण तू युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देतो. मैदानावर आणि मैदानाबाहेर तू असाच रहा." मोहम्मद आमिर व्यतिरिक्त इतर अनेक परदेशी क्रिकेटपटूंनी विराटला त्याच्या शानदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मोहम्मद आमीर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. पण तो जगभरातील विविध फ्रँचायझी लीगमध्ये भाग घेत असतो. लवकरच मोहम्मद आमीरही पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
@imVkohli brother for me u are a true leader of upcoming generation in cricket because u are inspiration for young Cricketers. keep rocking on and of the field. pic.twitter.com/0ayJoaCC3k
— Mohammad Amir (@iamamirofficial) January 15, 2022
विराट कोहलीने मोहम्मद अमीरला त्याची एक बॅट भेट म्हणून दिली होती. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान विराट कोहलीने त्याची बॅट मोहम्मद अमीरला दिलेली, ज्याचा फोटो खूप व्हायरल झाला होता.
दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, बोर्ड सचिव जय शाह यांनी शनिवारी विराट कोहलीबद्दल ट्विट केलं आणि कर्णधार म्हणून त्याच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
यानंतर आता बीसीसीआयकडून विराट कोहली आणि त्याच्या निर्णयासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलं आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटलंय की, "विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार म्हणून आणि कारकिर्दीबद्दल आम्ही त्याचं अभिनंदन करतो. बीसीसीआय आणि निवड समिती विराट कोहलीच्या या निर्णयाचा आदर करतो."