मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी 4 मे रोजी मोठा निर्णय घेत इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम अनिश्चित काळासाठी तहकूब केला आहे. खेळाडू कोरोना संक्रमित होत असल्याने या पार्श्वभूमीवर हा कठीण निर्णय घेण्याबाबत मंडळाला विचार करावा लागला. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले.
मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटलचा फिरकीपटू अमित मिश्राचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बीसीसीआयने मंगळवारी सांगितले की, आपातकालीन बैठकीत इंडियन प्रीमियर लीगची गव्हर्निंग कौन्सिल आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एकमताने आयपीएल 2021 चा हा हंगाम तातडीने प्रभावीपणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआय कोणत्याही प्रकारे सहाय्यक कर्मचार्यांच्या किंवा त्यांच्या स्पर्धेच्या आयोजनात सामील असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेची तडजोड करू शकत नाही. सर्वांच्या सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ही खूप कठीण वेळ आहे, विशेषत: भारतात अशा वेळी आम्ही लोकांमध्ये काही सकारात्मक आणि उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. पण आता स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सामील झालेले सर्वजण आता त्यांच्या कुटुंबासोबत घरी परत जातील.
9 एप्रिलपासून सुरू झालेली आयपीएल आज स्थगित झाली. आतापर्यंत एकूण 29 सामने खेळल्यानंतर बीसीसीआयला 3 मे रोजी कोलकाताचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी मिळाली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणारा त्यांचा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा आणखी दोन खेळाडूंना संसर्ग झाल्याचं उघडकीस आणल्यानंतर एक दिवसातच ही स्पर्धा तहकूब करण्यात आली.