या बॉलरने पाच बॉल्समध्ये पाच विकेट्स घेत रचला इतिहास

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने पाच बॉल्समध्ये पाच विकेट्स घेत सर्वांनाच एक धक्का दिला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 28, 2017, 08:32 PM IST
या बॉलरने पाच बॉल्समध्ये पाच विकेट्स घेत रचला इतिहास  title=
Image: https://www.facebook.com/nick.gooden

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने पाच बॉल्समध्ये पाच विकेट्स घेत सर्वांनाच एक धक्का दिला आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये फहीम अशरफ याने हॅटट्रिक घेत इतिहास रचला. टी-२० क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला पाकिस्तानी बॉलर ठरला आहे मात्र, त्याहूनही मोठी बातमी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील आहे.

ऑस्ट्रेलियामधील यॉलर्न नॉर्थचा क्रिकेटर निक गुडेन याने ट्रिपल हॅटट्रिक घेत एक नवा इतिहास रचला आहे. निक गुडेन याने सलग पाच बॉल्समध्ये पाच विकेट्स घेतले आहेत. याला क्रिकेटच्या भाषेत ट्रिपल हॅटट्रिक असे म्हटले जाते.

गुडेन याने यॉर्लन नॉर्थ आणि लॅटरॉब विरोधात सेंट्रल गिप्सलँड क्रिकेट असोसिएशन मॅचमध्ये हा कारनामा केला आहे. संपूर्ण मॅचमध्ये गुडेनने १७ रन्स देत ८ विकेट्स घेतले. त्याने १० बॉल्समध्ये ८ विकेट्स घेतले आहेत ज्यामध्ये ट्रिपल हॅटट्रिकचाही समावेश आहे.

हेरॉल्ड सनच्या वृत्तानुसार, गुडेन दुखापतग्रस्त झाल्याने गेल्या एका वर्षापासून मैदानाबाहेर आहे. गुडेनने सांगितले की, तो फास्ट बॉलर नाहीये. मी केवळ सामान्य बॉलर प्रमाणे बॉलिंग करत होतो. सुरुवातीला तर मी दोन वाईड बॉल्स टाकले त्यावेळी सर्वजण माझ्यावर हसत होते. मात्र, नंतर मी चांगली बॉलिंग करत विकेट्स घेतले.

गुडेनने सांगितले की, "माझ्या भावाने ३० रन्स देऊन ८ विकेट्स घेतले होते. हॅटट्रिक घेतल्यानंतर मनात आलं होतं की, भावाचा रेकॉर्ड तोडू शकतो आणि मी ते करुन दाखवलं." पण, बॅटिंगमध्ये गुडेनला चांगली कामगिरी करता आली नाही. तिसऱ्याच बॉलमध्ये तो आऊट झाला. मात्र, त्याने बॉलिंगमध्ये एक इतिहास रचला.