IND vs AUS Final : वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न भंगलं, पुन्हा ऑस्ट्रेलिया ठरली 'व्हिलन', फायनलमध्ये 79 धावांनी दारूण पराभव

Australia Beat India in U19 World Cup Final : ऑस्ट्रेलियाने भेदक गोलंदाजाच्या जोरावर फायनलमध्ये विजय मिळवला अन् कांगारूंची सेना भारतासाठी पुन्हा एकदा व्हिलन ठरली आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Feb 11, 2024, 08:59 PM IST
IND vs AUS Final : वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न भंगलं, पुन्हा ऑस्ट्रेलिया ठरली 'व्हिलन', फायनलमध्ये 79 धावांनी दारूण पराभव title=
IND vs AUS U19 World Cup Final result

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या खेळल्या गेलेल्या अंडर -19 वर्ल्ड कप फायनलमध्ये (U19 World Cup Final) टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या दिलेल्या 254 धावांचं आव्हान पार करताना टीम इंडिया पत्त्यासारखी ढासळली अन् टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाचं स्वप्नभंग झालं आहे. ऑस्ट्रेलियाने भेदक गोलंदाजाच्या जोरावर फायनलमध्ये विजय मिळवला अन् कांगारूंची सेना भारतासाठी पुन्हा एकदा व्हिलन ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी टीम इंडियाचा पराभव केला अन् 14 वर्षानंतर अंडर-19 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. (Australia win 4th U19 World Cup latest marathi News)

ऑस्ट्रेलियाने 253 धावांचा डोंगर टीम इंडियासमोर रचला होता. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला 254 धावा करणं गरजेचं होतं. मात्र, टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. आर्शिन कुलकर्णी 3 धावा करत बाद झाला. तर मुशीर खान देखील झटपट धावा करण्याच्या नादात विकेट गमावून बसला. त्याने फक्त 22 धावा केल्या. त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन दास यांनी एकामागून एक विकेट्स थ्रो केल्यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडली. 90 वर अर्धा संघ तंबूत परतला होता. मात्र, आर्दश कुलकर्णीने एक बाजू लावून धरली. आदर्शची विकेट गेल्यावर मात्र टीम इंडियाचा खेळ खल्लास झाला. मुरुगन अभिषेक याने अखेरपर्यंत झुंज दिली. परंतू त्याला यश आलं नाही. तो 42 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आरामात सामना खिशात घातला अन् चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्ड कप विनर होण्याचा मान मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावा केल्या होत्या. अंडर 19 वर्ल्ड कप इतिहासात फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावा करत इतिहास रचला. टीम इंडियाला फायनल जिंकायची असेल तर कांगारूंना 250 च्या आत गुंडाळावं लागेल, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होतं. मात्र, ऑस्ट्रेलियाने 250 चा टप्पा पार केलाय. ऑस्ट्रेलियाकडून हरजस याने 64 बॉलमध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. तर कॅप्टन ह्यू वेबगेन याने 48 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर रायन हीक्स याने 20 आणि चार्ली एंडरसन याने 13 धावा कुटल्या अन् टीम इंडिया समोरच्या अडचणी वाढल्या. मात्र, भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज राज लिंबानी आणि नमन तिवारी यांच्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियाला नवे हिरो सापडलेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भारत अंडर-19 :- आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन  (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्या पांडे.

ऑस्ट्रेलिया अंडर-19 :- ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.