मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने त्यांच्याच खेळाडूंवर गंभीर आरोप केले आहेत. आयपीएल लिलावामध्ये मोठी रक्कम मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू विराट कोहली आणि त्याच्या साथीदारांची चापलुसी करायचे. आयपीएलमध्ये बोली लागणार नाही या भीतीने ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू विराट आणि त्याच्या साथीदारांचं स्लेजिंगही करायचे नाहीत. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जेव्हा भारताशी सामना करतात, तेव्हा त्यांची नजर एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या आयपीएलवर असते, असा दावाही मायकल क्लार्कने केला आहे.
'आयपीएलमुळे भारत आर्थिकदृष्ट्या किती शक्तीशाली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटूच नाहीत, तर प्रत्येक टीमने या काळात भारताशी चापलुसी केली. कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंवर मैदानात स्लेजिंग होत नव्हतं, कारण त्यांना एप्रिल-मे महिन्यात त्यांच्यासोबत खेळायचं होतं,' असं क्लार्क म्हणाला आहे.
'ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानात प्रेमाने वागले. त्यांनी आपल्या नैसर्गिक आक्रमक स्वभावाशी तडजोड केली. मी मैदानात कोहलीवर निशाणा साधणार नाही, कारण मला बंगळुरूच्या टीमकडून खेळून ६ आठवड्यात १० लाख डॉलर कमवायचे आहेत, असंच खेळाडूंचं वर्तन होतं,' असं क्लार्कला वाटतं.
कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षीची आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. २९ मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे, पण भारतातली सध्याची कोरोनाची परिस्थिती बघता १५ एप्रिलपासूनही आयपीएल सुरु होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. यंदाच्या वर्षी आयपीएल स्पर्धा रद्द करावी लागली, तर बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.