मालदीवमध्ये जन गण मनचे सूर, पहिल्याच दिवशी 4 गोल्ड मेडलसह 12 मेडल्सची कमाई

Asian Bodybuilding Championship 2022 : पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी ठरले मास्टर्स आशिया श्री

Updated: Jul 18, 2022, 09:45 PM IST
मालदीवमध्ये जन गण मनचे सूर, पहिल्याच दिवशी 4 गोल्ड मेडलसह 12 मेडल्सची कमाई title=

Asian Bodybuilding Championship 2022 : मालदीवच्या माफुशी बेटावर सुरू असलेल्या 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडू आणि पाऊस दोघेही बरसले. त्यात भारताच्या खेळाडूंनी चार सुवर्ण पदकांची जबरदस्त कमाई केल्यामुळे मालदीवमध्ये अर्ध्या अर्ध्या तासाच्या फरकाने 'जन गण मन'चे सूर घूमले. 

नवी मुंबईच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी यांनी अभिमानास्पद कामगिरी करताना मास्टर्स शरीरसौष्ठवाच्या गटात आशिया श्रीचा बहुमान पटकावून इतिहास रचला. तसंच दिव्यांगाच्या गटात के. सुरेश, ज्यूनियर गटात (75 किलो) सुरेश बालाकुमार, स्पोर्टस् फिजीक प्रकारात अथुल कृष्णा यांनी सोनेरी यश संपादलं.

मालदीवमध्ये सुरू झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वात मोठा आणि बलाढ्य संघ भारताचाच असल्यामुळे माफुशी बेटावर भारतीय खेळाडूंचे वादळ घोंघावणार हे स्पष्ट होतं. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेही तसंच. माफुशी बेटावर वादळी वाऱ्याचं आगमन झाल्यामुळे आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

मात्र मालदीव शरीरसौष्ठव संघटनेने तासाभरात नव्या आयोजन स्थळाची व्यवस्था केली. ज्यात अकरा गटाच्या स्पर्धा खेळविल्या गेल्या. वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या या स्पर्धेच्या प्रारंभापासून भारतीय खेळाडूंनीही वादळी कामगिरीचा धडाका दिला. दिव्यांगाच्या पहिल्याच गटात सोनंच नव्हे तर रौप्य आणि कांस्यपदकही भारतीयांनी जिंकलं. के. सुरेशने सुवर्ण विजेती कामगिरी करत भारताचं सुवर्ण पदकाचं खातं उघडलं.

सुभाष पुजारींचे सुवर्ण महाराष्ट्र पोलीस दलाला अर्पण
नवी मुंबईच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून सेवेत असलेल्या सुभाष पुजारी यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचं पदक खोवलं. यावेळी पदकाचा रंग सोनेरी होता. 'मास्टर्स आशियाई श्री' च्या 80 किलो वजनी गटात  मलेशिया आणि व्हिएतनामच्या तगड्या खेळाडूंवर मात करीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 

याआधी विएतनाम इथं झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत त्यांना कांस्यपदक पटकावलं होतं. आज त्या कामगिरीवर मात करत सुभाष पुजारी यांनी सोनेरी इतिहास रचला. पुजारींनी आपल्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर आपलं सुवर्ण महाराष्ट्र पोलीस दल, आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्पण केला. त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे, प्रेमामुळेच मी इथवर पोहोचलोय. आता माझा पुढचे लक्ष्य जागतिक स्पर्धेत याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची असेल असं सुभाष पुजारी यांनी म्हटलं आहे.

भारताच्या के.सुरेश आणि सुभाष पुजारीपाठोपाठ स्पोर्टस् फिजीकच्या 175 सेमी उंचीच्या गटात अथुल कृष्णाने इराणच्या महदी खोसरामवर मात करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र स्पोर्टस् फिजीकच्या 170 सेमीच्या गटात युवराज जाधवचं सुवर्ण थोडक्यात हुकलं. मालदीवचा अझनीन राशद अनपेक्षितपणे अव्वल ठरला. ज्यूनियर गटाच्या 75 किलोवरील वजनी गटात सुरेश बालाकुमारने बाजी मारली. भारताच्या अंबरीश केजी, मनु कृष्णन यांनीही रौप्य पदकं पटकावली.

52 गट आणि 382 खेळाडू
मालदीव सरकार आणि मालदीव शरिसौष्ठव संघटनेने अत्यंत शिस्तबद्ध आणि अप्रतिमरित्या आयोजन केलेल्या या स्पर्धेत एकंदर 52 गटांमध्ये चुरस होत असून आशियातील 24 देशांतील विक्रमी 382 खेळाडूंना आपला सहभाग नोंदविला. या देखण्या स्पर्धेचं उद्घाटन मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालीह यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी मालदीवचे क्रीडामंत्री अहमद महलुफ, उप क्रीडामंत्री मोहमद अझमील, जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष दातुक पॉल चुआ आणि सरचिटणीस चेतन पाठारे हे उपस्थित होते. 

54 वी आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेचा निकाल

दिव्यांग शरीरसौष्ठव : 1.के. सुरेश (भारत), 2. लोकेश कुमार (भारत), 3. मुकेश मीना (भारत).

पुरूष फिटनेस फिजीक (170 सेमी) : 1. वानचाइ कंजानापायमाइन (थायलंड), 2.त्रानहोआंगडुय थुआन (व्हिएतनाम), 3. राजू राय (भारत), 4. आरंभम मंगल (भारत).

पुरूष फिटनेस फिजीक (170 सेमीवरील) :1. दमरोंगसाक सोयसरी (थायलंड) 2. नत्तावत फोचत (थायलंड), 3. तेनझिंग चोपल भुतिया (भारत), 4. मोर्तझा बेफिक्र (इराण), 5.कार्तिक राजा (भारत).

ज्यू. पुरूष शरीरसौष्ठव (75 किलो) : 1. के तुएन (व्हिएतनाम), 2. मंजू कृष्णन (भारत), 3. मुस्तफा अलसईदी (इराक), 4. कुमंथेम सुशीलकुमार सिंग (भारत), 5. ताकेरू कावामुरा (जपान).

ज्यू. पुरूष शरीरसौष्ठव (75 किलोवरील) : 1. सुरेश बालाकुमार (भारत), 2. उमर शहझाद (पाकिस्तान), 3. चिंगखेईनगानबा अथोकपम (भारत).

पुरूष स्पोर्टस् फिजीक (170 सेमी) : 1. अझनीन राशद (मालदीव), 2.युवराज जाधव (भारत), 3. अरसलान बेग (पाकिस्तान), 4. आरंभम मंगल (भारत), 5.मुदस्सर खान (पाकिस्तान).

पुरूष स्पोर्टस् फिजीक (175 सेमी) : 1. अथुल कृष्णा (भारत), 2.महदी खोसरवी (इराण), 3. थेपहोर्न फुआंगथापथिम (थायलंड), 4. सचिन चौहान (भारत), 5.अली सलीम इब्राहिम (मालदीव).

पुरूष स्पोर्टस् फिजीक (180 सेमी) : 1. बायत येर्कयेबुलान (मंगोलिया), 2.प्रकासित कृआबत (थायलंड), 3. मोहसेन मोन्सेफ नवेखी (इराण), 4. स्वराज सिंग (भारत), 5. शिनु चोव्वा (भारत).

पुरूष स्पोर्टस् फिजीक (180 सेमीवरील) : 1. अलीरेझा अलावीनेझाद (इराण), 2. अंबरीश के.जी. (भारत), मोहम्मद इमराह (मालदीव).

मास्टर्स पुरूष शरीरसौष्ठव (40 ते 49 वय- 80 किलो) : 1. सुभाष पुजारी (भारत), 2. मालवर्न अब्दुल्ला (मलेशिया), 3. एनगुएन वॅन क्युआंग (व्हिएतनाम), 4.जिराफन पोंगकम (थायलंड), 5. जगत कुमार (भारत).

मास्टर्स पुरूष शरीरसौष्ठव (40 ते 49 वय- 80 किलोवरील) : 1.शहझाद अहमद कुरेशी (पाकिस्तान), 2. उमरझाकोव्ह कुरेशी (पाकिस्तान), 3. ए. पुरूषोत्तमन (भारत), 4. फदी जड्डोआ (इराण), 5. नरेश नागदेव (भारत).