Asia Cup 2023 India Vs Pakistan Next Match: भारत विरुद्ध पाकिस्तानचा एक दिवसीय क्रिकेटमधील सामना 2 सप्टेंबर रोजी तब्बल 4 वर्षांनी झाला. मात्र हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचलेल्या हजारो आणि टीव्हीवरुन पाहणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांनी शनिवारी निराशा झाली. श्रीलंकेतील कॅण्डीमधील मैदानात झालेला आशिया चषक स्पर्धा 2023 मधील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. एक रंजक सामना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेटरसिकांचा पावसामुळे हिरमोड झाला. केवळ एकच डावाचा खेळ झाल्यानंतर पावसाची रिपरिप सुरु असल्याने दुसऱ्या डावातील एका षटकाचाही खेळ झाला नाही. मात्र हा सामना पावसात वाहून गेला असला तरी भारत आणि पाकिस्तानचा संघ आशिया चषकामध्ये पुन्हा 2 वेळा आमने-सामने येऊ शकतो हे या अनिर्णित सामन्यामुळे स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे यापैकी पहिला सामना याच आठवड्यात होईल.
आशिया चषक स्पर्धेमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल दोन्ही देशांतील चाहत्यांबरोबर सर्वच क्रिकेटप्रेमींना फार उत्सुकता होती. मात्र पावसाने सर्वांचीच निराशा केली. शनिवारच्या या सामन्यामध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने उत्तम गोलंदाजी करत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सामन्यातील पहिल्या काही षटकांमध्येच तंबूत पाठवलं. यानंतर हारिस रौफने भारताला 2 धक्के दिले. 66 धावांवर 4 गडी बाद अशी अवस्था असताना इशान किशन आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सावरला. दोघांनी 138 धावांची पार्टनरशीप करत भारतीय संघाला 266 धावांपर्यंत पोहचवलं. पाकिस्तानच्या संघासमोर 267 धावांचं आव्हान होतं. मात्र बाबर आझमच्या संघातील एकाही फलंदाजाला मैदानात उतरण्याची संधीच मिळाली नाही. पावसाची रिपरिप सुरुच राहिल्याने सामना अनिर्णित घोषित करत रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाल्याने पाहिल्या सामन्यात नेपाळला 200 हून अधिक धावांनी धूळ चारणारा पाकिस्तान 'सुपर-4'साठी पात्र ठरणारा पहिला संघ झाला. भारताला आता नेपाळला पराभूत करावं लागणार आहे.
आशिया चषक स्पर्धेची रचना पाहिल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये किमान एक सामना पुन्हा होईल असं दिसत आहे. या स्पर्धेत 6 संघ खेळत आहे. भारतीय संघांबरोबर पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहे. तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका ब गटात आहे. या 6 संघांपैकी 4 संघ पुढील डावात म्हणजेच 'सुपर-4'मध्ये जातील. त्यापैकी पहिलं स्थान कालच पाकिस्तानने निश्चित केलं. प्रत्येक संघ साखळी फेरीमध्ये 2 संघाविरोधात खेळणार आहे. सुपर-4 मध्ये प्रत्येक संघ अन्य 3 संघांविरोधात 1-1 सामना खेळणार आहे. भारताचा साखळी फेरीतील पुढील सामना सोमवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध आहे. हा सामना जिंकून भारत सुपर 4 मध्ये पोहचेल. विशेष म्हणजे पावसामुळे सामना रद्द झाला आणि गुण वाटून देण्यात आले तर 2 गुणांसहीत भारतच अ गटातून पात्र ठरणारा दुसरा संघ ठरेल.
नक्की पाहा हा व्हिडीओ >> Video: इशानला Out केल्यानंतरची 'ती' कृती हारिस रौफला महागात पडली; पंड्याने उतरवला माज
पाकिस्तान हा अ गटातून पात्र ठरलेला पाहिला संघ झाला असल्याने भारत दुसऱ्या स्थानी राहील. सामन्यांच्या नियोजनानुसार अ गटातील पहिला संघ म्हणजेच A1 आणि अ गटातील दुसरा संघ म्हणजेच A2 संघ 10 सप्टेंबर रोजी सामना खेळतील. म्हणजेच भारताने सुपर 4 मध्ये प्रवेश केल्यानंतर या फेरीतील एक सामना निश्चितपणे पाकिस्तानविरुद्ध होईल. वेळापत्रकाप्रमाणे हा A1 विरुद्ध A2 सामना म्हणजेच भारत-पाकिस्तान सामना 10 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.
'सुपर-4'मधून पुढे जाणारे दोन्ही संघ भारत पाकिस्तान असतील तर स्पर्धेचा अंतिम सामनाही या दोन्ही संघांमध्येच होईल.